संपाचा केंद्रबिंदू नाशिक

संपाबाबत पालकमंत्र्यांची मध्यस्थी ठरली फोल

0
नाशिक | दि. ३ प्रतिनिधी-शेतकरी संपाला पुणतांब्याहून थिनगी पडली. मात्र येथील शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला असला तरी, नाशिकमध्ये मात्र संप कायम आहे.
उद्या याबाबत नाशिक येथे बैठक होणार आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पालकमंत्र्यांना नाशिकला पाठवले असले तरी शेतकरी संपाबाबत ठाम असल्याने या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे समजते. त्यामुळे पालकमंत्र्यांची मध्यस्थी फोल ठरल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्र्यांनी संप मिटल्याचे जाहीर केले असले तरी, नाशिकला संप मात्र कायमच आहे. उलट राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उद्या नाशिकला येऊन संपाबाबत भूमिका मांडणार असल्याने नाशिक हेच संपाचे केंद्रबिंदू बनले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे दूत पालकमंत्री गिरीष महाजन तातडीने नाशिकला दाखल झाले. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पंचवटीतील मार्केट कमिटीत आंदोलन केले. पालकमंत्र्यांनी या शेतकर्‍यांसोबत चर्चा करण्यासाठी भाजपच्या खासदार, आमदरांना पाठवले; परंतु या पदाधिकार्‍यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्धार केला.

आज दुपारी पालकमंत्र्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसही बोलावले होते. मात्र, या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत.

मात्र तरीही विविध संघटना आंदोलन करत आहेत. त्यांचे काही मुद्दे असतील तर त्यांनी यावे, सरकारशी चर्चा करावी, आम्ही त्यांच्यासोबत चर्चेस तयार आहोत, असे आवाहन त्यांनी केले. मात्र शेतकर्‍यांनीही आपला माल बाजारात आणावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

*