बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधू गजाआड

0
नाशिकरोड | दि. २ प्रतिनिधी- एकलहरे रोड परिसरात प्रेम प्रकरणाचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून नंतर तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात प्रियकराला त्याच्या बहिणीने मदत केल्याने पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी करून अटक केली. परिणामी तिचा विवाह आज दि. ३ रोजी होणार होता.

परंतु बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधूला गजाआड व्हावे लागल्याची घटना घडली. रोहित पाटील, रा. अशोकनगर, सातपूर या युवकाचे दिंडोरी रोडवर राहणार्‍या हर्षदा आहिरे या युवतीशी प्रेमसंबंध होते. रोहितने आपल्याशी विवाह करावा म्हणून हर्षदाने तगादा लावला होता.

जर विवाह केला नाहीतर मी तुझ्या बहिणीच्या लग्नात बरेवाईट करून घेईन, अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून रोहितने हर्षदाचा काटा काढण्याचे ठरविले. त्यामुळे तिला घरी बोलावून तिची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून एकलहरे रोड परिसरातील किर्लोस्कर कंपनीच्या भिंतीलगत आणून त्या ठिकाणी तिच्या मृतदेहावर रॉकेल ओतून तिला जाळून टाकले.

हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस आल्यानंतर हर्षदाच्या मोबाईल कॉल रेकॉर्डवरून रोहित याच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने हर्षदाचा खून केल्याचे पोलीसांना सांगितले.
दरम्यान हा खून करण्यासाठी त्याची बहिण मोनिका हिने त्याला मदत केल्याची माहिती चौकशीत उघडकीस झाल्यानंतर पोलीसांनी मोनिकाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन तिला अटक केली.

मोनिका हिचा विवाह आज (दि. ३) होणार होता. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. परंतु मोनिका बोहल्यावर चढण्यापूर्वीच तिला कारागृहाची हवा खावी लागली.

LEAVE A REPLY

*