Saturday, April 27, 2024
Homeजळगावvideo ‘सर्कस’ चालविणे हीच मोठी सर्कस

video ‘सर्कस’ चालविणे हीच मोठी सर्कस

जळगाव

केंद्र शासनाने सर्कशीत वन्यप्राण्यांच्या खेळांवर बंदी आणली तेव्हापासूनच सर्कस उद्योगाला उतरती कळा सुरु झाली. सध्याच्या परिस्थितीत सर्कस उद्योग हा पूर्णपणे मृतप्राय होत चाललेला आहे.

- Advertisement -

शासनाने या कलेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही तर येत्या चार-पाच वर्षात सर्कस दुर्लभ होईल. सध्या सुरु असलेली सर्कस चालविणे हिच मोठी सर्कस असल्याचा सूर शुक्रवारी देशदूत कट्ट्यावर उमटला.
जळगाव शहरातील नेरी नाका परिसरातील एस.टी. वर्कशॉपजवळ सुरु असलेल्या भारत सर्कसचे कलावंत देशदूत संवाद कट्ट्यात सहभागी झाले होते.

भारत सर्कसचे व्यवस्थापक राजन पिल्लई, श्रीमंडल, सुमीत राय, सुरजकुमार यादव (जोकर), सोमराज प्रजा या सर्वांचे स्वागत संपादक अनिल पाटील यांनी केले. यावेळी दुर्लभ होत चाललेल्या सर्कस या व्यवसायासंबंधी बोलताना व्यवस्थापक राजन पिल्लई यांनी सांगितले की, सर्कस हा व्यवसाय संपत चाललेला आहे.

प्रेक्षकांना मनोरंजनासाठी जे हवे ते अलिकडे सर्कशीतून मिळत नाही. पुर्वी प्रेक्षकांना सर्कशीत प्राणी बघायला आवडायचे मात्र, केंद्र सरकारने वन्यप्राण्यांवर बंदी आणली तेव्हापासून सर्कस व्यवसायाला उतरती कळा लागली. सर्कशीतील वाघ, सिंह, हत्ती इतिहासजमा झाले आहेत. अंबानी सारख्या उद्योगपतीने हत्ती खरेदी केलेले चालतात मात्र, या सरकरला सर्कशीत मनोरंजनासाठी हत्ती चालत नाहीत हे दुदैव आहे. बालकामगार कायद्याचा परिणामदेखील सर्कशीवर झाला आहे.

सर्कशीतून शिक्षण दिले जाते. आणि दिलेले शिक्षण कलेच्या रुपाने सादर केले जाते. मात्र, शासनाने या शिक्षणालाच बालकामगार कायद्याच्या चौकटीत बांधले आहे. सर्कस चालवणार्‍यांची कोणतीही संघटना नाही. त्यामुळे शासनही आमच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

दिवसाला 80 हजार रुपये खर्च असलेल्या सर्कशीतून कधी-कधी दोन हजार रुपयेदेखील मिळत नाही. ही मोठी शोकांकिका आहे. सर्कसचा तंबु म्हणजे हे एक गाव असते. सर्कशीत काम करणारा कलावंत सर्कस सोडुन बाहेरच्या जगात काहीही करु शकत नाही.

म्हणून कलावंत आणि त्यांच्या परिवारासाठी ओढाताण करुन आम्ही सर्कस चालवतो असेही त्यांनी सांगतिले. श्री मंडल म्हणाले की, कृत्रिम हसणे आणि नैसर्गिक हसणे यात फार मोठा फरक असतो. सर्कशीतून व्यक्ती नैसर्गिकरित्या हसतो. हास्य हरविलेल्या या युगात नैसर्गिक हास्याची खरी आवश्यकता आहे आणि ती फक्त सर्कशीतच मिळू शकते. असेही त्यांनी सांगितले.

सुमीत राय हा कलावंत म्हणाला की सर्कशीकडे बघण्याची प्रेक्षकांची मानसिकता बदलने गरजेचे आहे. सुरजकुमार यादव (जोकर) म्हणाला की, माझ्या कलेच्या माध्यमातून लोकांना हसविण्यात मला खरा आनंद मिळतो. सोमा प्रजा ही महिला कलावंत म्हणाली सर्कसमधील कलावंताना आजही लोक स्विकारताहेत यातच मला आनंद आहे.

सर्कसचा तंबु हेच माझे घर आणि विश्व आहे. असे सांगतानाच तिने प्रसिध्द कलावंत राजकुमार यांच्या मेरा नाम जोकर चित्रपटातील जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहा.. या गाण्याची आठवण करुन दिली.

यावेळी कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी भारतातील सर्कशीचा इतिहास सांगितला. 1880 पासून सुरु झालेली सर्कस कशी बहरत गेली हेही त्यांनी सांगितले.

भारतीय सर्कसचे जनक विष्णूपंत छत्रे

इंग्लडमध्ये 250 वर्षांपुर्वी सुरू झालेल्या सर्कसला भारतात 140 वर्षांचा इतिहास आहे. विष्णूपंत मोरेश्वर छत्रे यांनी 1880 साली भारतात ग्रॅन्ट इंडीयन सर्कस सुरू केल्याची इतिहासात नोंद असून सांगली जिल्ह्यातील मिरजेतील म्हैसाळ येथील बाबुराव कदम यांनी 1920 साली सर्कस सुरू केली तर नागपूरचे चंदू गाडगे यांनीही सुरू केली. इतकी मोठी परंपरा असलेला सर्कस व्यवसाय आता डबघाईला आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या