तीन लाख विद्यार्थी देणार शिक्षक पात्रता परीक्षा

0
गणोरे (वार्ताहर) – राज्यात येत्या 22 जुलै रोजी होणार्‍या शिक्षक पात्रता परीक्षेकरिता सुमारे तीन लाख विद्यार्थी प्रविष्ठ झाले असल्याची माहिती राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली. राज्यात शिक्षक होण्याकरिता आवश्यक पात्रता म्हणून या परीक्षेचे महत्त्व आले आहे. शासनाने यावर्षी शासकीय शाळांबरोबर खाजगी संस्थामधील शिक्षक भरती देखील स्वतःच्या अखत्यारीत घेतली आहे. त्यामुळे यावर्षी अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्यात यावर्षी विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याकरिता आवश्यक पात्रता म्हणून टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. राज्यात गत चार वर्षांपासून परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षी परीक्षा परिषदेने नियोजनात बदल करीत गैरप्रकाराला आळा घालण्याकरिता विविध पावले उचलली आहेत. पाचशे विद्यार्थ्यांच्या मागे एक परीक्षा केंद्र असून तेथे स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर माध्यमांची केंद्र देखील स्वतंत्र देण्यात आली आहेत. एका बैठक कक्षात केवळ 24 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक कक्षासाठी असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक परीक्षा कक्षात चार संच पुरविण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तपत्रिका यांचे संच वर्गनिहाय पाकीटात बंद असणार आहेत. पूर्वीप्रमाणे संच केंद्रावर न उघडता प्रत्येक परीक्षेच्या वर्गातच उघडण्यात येणार आहे.
परीक्षा कक्षात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. कक्षात जाण्यापूर्वीच तपासणी करण्यात येणार आहे. उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी देखील प्रत्येक विद्यार्थ्यांना पेन परीक्षा परीषदेच्यावतीने पुरविला जाणार आहे. परीक्षा अत्यंत कडक वातावरणात घेण्यात येईल अशी तयारी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे कोणताही गैरप्रकार होण्याची शक्यता नाही.
राज्यात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यापासून प्रवेश पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून या परीक्षेकरिता लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण मात्र अत्यंत अल्प आहे. अवघे 3-4 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे येत्या काळात शिक्षकांची वाढती गरज लक्षात घेता परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असल्याने यावर्षी सुमारे 2 लाख 97 हजार विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*