दहा हजारांच्या ‘जीआर’ची होळी

0
नाशिक । शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणे आवश्यक असून दहा हजार रूपयांचे कर्ज देउन त्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याचा आरोप करत शेतकरी समन्वय समितीच्यावतीने शासन निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाने काढलेल्या दहा हजार रूपयांच्या शासन निर्णयाची होळी केली.

सरसकट कर्जमाफी झालीच पाहीजे , मुर्दाबाद मुर्दाबाद राज्य सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्यात आले. शेतकरी संपाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या मंत्रीगट उच्चाधिकार समितीने सरसकट कर्जमाफीला तत्वतः मंजुरी दिली. तसेच खरिप हंगामासाठी दहा हजार रूपयांचे कर्ज देण्यास मान्यता दिली.

मात्र मुळात शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमुक्ती हवी असल्याने दहा हजार रूपये कर्ज देण्याचा प्रश्नच येतो कुठे असा सवाल समितीने उपस्थित केला. तसेच दहा हजार रूपयांचे कर्ज देण्यासाठी लावण्यात आलेले निकष अतिशय किचकट असून कर्ज मिळण्याऐवजी कर्ज कसे मिळणार नाही.

यासाठीच हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप समिती सदस्यांनी यावेळी केला. त्यामुळे दहा हजार कर्जाचे निकषच कर्जमुक्तीसाठी लावणे चुकिचे आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. थकित कर्जाची मुदत 30 जून 2017 असावी व तसेच नियमित कर्ज भरणारया शेतकर्‍यांचा सरसकट कर्जमुक्तीत समावेश करावा.

शासनाने कर्जमुक्तीसंदर्भात त्वरित निर्णय जाहीर करावा. तसेच शेतकरीविरोधी निकष रदद करावे अशी मागणी करत शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी राजू देसले , करण गायकर , गणेश कदम , चेतन शेलार , कैलास खांडबहाले , प्रकाश चव्हाण , निलेश शेलार , तुषार गवळी , राजेश पवार , सुनिल देशमुख , संदिप निगळ , देवा माळी आदिंसह शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*