दहा रुपयांच्या नाण्यांचा गोरखधंदा

0

देवळाली कॅम्प | दि. ९ वार्ताहर- हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने सरकारने दहा रुपयांचे नाणे चलनात आणले. सध्या हे नाणे मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असताना अनेक बँका व व्यावसायिक ते घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन ठराविक लोकांनी सहकार क्षेत्रातील बँकांना टार्गेट करत असे नाणे स्वीकारा, अन्यथा तुमच्या विरोधात कारवाई करू, अशा धमक्या देत आपला गोरखधंदा सुरू केला आहे. नोटाबंदीच्या काळात अनेकांनी नोटा बदलण्यासाठी मजुरांना रांगेत उभे करून दररोज नोटा बदलून घेण्याचे धंदे केले.

आता दहा रुपयाचे नाणे स्विकारले जात नाही म्हणून काही लोकांनी दहा ते २० टक्के कमिशनवर असे नाणे स्विकारून ते बँकेत भरण्यासाठी दररोज बँकांमध्ये हजेरी लावत आहेत. हे नाणे चलनात ग्राह्य धरले असल्याने ते स्विकारणे बँकांना अपरिहार्य आहे.

मात्र त्याच त्याच व्यक्ती दररोज चार ते पाच हजाराची नाणे आपल्या खात्यात भरतात व नंतर खात्यातून पैसे काढून घेतात. याबाबत बँकांमध्ये अधिकारी व ग्राहकांमध्ये वाद होत आहेत. शेतकर्‍यांनीही एका राष्ट्रीयकृत बँकेसमोर याबाबत उपोषण केले होते. मात्र काही नागरिक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आपला गोरखधंदा करत आहेत.

LEAVE A REPLY

*