चांदवडला भीषण अपघात; 10 ठार 14 जखमी

0

चांदवड (हर्षल गांगुर्डे) ता. ७ : चांदवडपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या आडगाव टप्पा शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल महाराणाजवळ आज गुरुवारी (दि. 7) सकाळी 5-35 वाजता मिनी टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकचा भीषण अपघात होऊन अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 14 गंभीर जखमी आहेत.

मृतांमध्ये 6 महिला, 2 पुरुष, एक 16 वर्षीय मुलगी व 7 वर्षाच्या एका लहान मुलाचा समावेश आहे.

14 गंभीर जखमी असलेल्या व्यक्तींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची अवस्था अत्यंत गंभीर आहे.

कल्याण येथील 22 प्रवासी यात्रेकरू कल्याणच्या साई ट्रॅव्हल्सच्या मिनी बसने (क्र. एम. एच. 05 आर 0357) देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेले होते.

उज्जैन येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन काल बुधवारी दि. 6 सायंकाळी ओंकारेश्वर येथे दर्शन घेतले व रात्री परतीच्या प्रवासाला कल्याणकडे जात असताना आज गुरुवारी (दि. 7) सकाळी 5-35 वाजता चांदवडपासून नाशिककडे 8 कि.मी. अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्याच्या कडेला पंक्चर अवस्थेत असलेल्या वाळूच्या ट्रकला (क्र. एमएच 15 सी के 8422) धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

सकाळी अपघातस्थळी जखमींचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केल्याने जखमी अवस्थेत असलेल्या यात्रेकरुंना वेळेत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चांदवड येथील डॉ. सतीश गांगुर्डे व भालचंद्र पवार यांनी अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सकाळी 5-50 वाजता चांदवड,  उसवाड, उमराणे,  सौंदाणे, लासलगाव, विंचूर, पिंपळगाव आदी जवळपासच्या 108 नंबरच्या 7 रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ बोलावण्याने जखमींना वेळेत उपचार करणे शक्य झाले व जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले.

अपघातातील मृत व्यक्तींची नावे- जागृती प्रकाश घावरी (35, कल्याण), गुंजन अजय वालोदरा (28, कल्याण), गिता नरशी परमार (45, कल्याण), पवन प्रकाश घावरी (7, कल्याण), लक्ष्मीबाई नानजी परमार (65, कल्याण), किसन बाबा चव्हाण (58, कल्याण), प्रकाश सन्ना घावरी (35, कल्याण), काऊ छगन चव्हाण (48, कल्याण), गिता मोहन परमार (40, कल्याण), निशा प्रकाश घावरी (16, कल्याण)

 जखमी व्यक्तींची नावे- गिता कालिदास वलोदरा (34, कल्याण), राधी तुळशी राठोड (40, कल्याण), जमुना गोविंद चव्हाण (70, कल्याण), मंजु सुनील गुजराथी (31, नाशिक), प्रगती सुनिल गुजराथी (12, नाशिक), कशिक प्रकाश घावरी (14, कल्याण), बिंदीया पानु गुजराथी (60, नाशिक), धनु मधुकर परमार (60, नाशिक), दसु वल्लभ दुमय्या (59, कांदिवली), ब्रिजेश वानेदरा (20, कांदिवली), अजय राजेश वानेदरा (45, कल्याण), प्रतिज्ञा सुनिल गुजराथी (12, कल्याण), मिनी बस चालक संतोष किसन पिठले (42, कल्याण), ट्रक क्लिनर पुनम कोंडाजी माळी (42, पळासदरे) यांचा समावेश आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप व पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतांची ओळख पटवून मदतकार्य केले. तर नेहमीप्रमाणेच सोमा टोल वे च्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी विशेष मदत केली. तसेच चांदवड नाशिक आणि कल्याण डोंबिवलीच्या शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही मदत केली.

७ रुग्णवाहिकेने मृतदेह कल्याणकडे रवाना

दरम्यान मृत व्यक्तींची संख्या दहाच्या घरात असल्याने चांदवड तालुका शिवसेनेने ७ रुग्णवाहिका उपलब्ध करून देत मृतदेह सायंकाळी ५ च्या सुमारास कल्याणकडे रवाना केलेत. यावेळी कल्याण येथून जवळपास १०० ते १५० नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करत हंबरडा फोडल्याने अतिशय भावनिक व गंभीर वातावरण दिवसभर चांदवड शहरात  होते.

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तत्परता

सकाळी सहा च्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यास सुरुवात होताच येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजपूत, गाढेकर, डॉक्टर हजारे, वाघमारे यांनी दिवसभर रुग्णावर उपचार केलेत. जखमींना  मानसिक आधार देण्यापासून तर उपचारात मदत करण्यात सरला खुटे, संगीता केदारे ह्या चतुर्थ श्रेणीतील महिलांनी अनुभवाचे कौशल्य पणाला लावत विशेष धावपळ केली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजपा  खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत मृत नातेवाईकांना दिलासा तसेच जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत जि. प. सदस्य डॉक्टर आत्माराम कुंभार्डे, डॉक्टर दवंडे, मोहनलाल शर्मा, अशोक भोसले, प्रशांत ठाकरे, सागर अहिरे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*