Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक, शिक्षक आमदारांसह रस्त्यावर; दिंडीत काल्पनिक वंचित प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Share

नाशिक । प्रतिनिधी

शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली तीन शिक्षक आमदारांसह हजारो शिक्षकांनी गुरुवारी (दि.12) सेवाग्राम वर्धा ते नागपूर पायी दिंडी आंदोलनास सुरुवात केली. गांधीजींच्या सेवाग्राम येथून या पायदिंडीस प्रारंभ झाला असून सोमवारी (दि.16) नागपूरच्या अधिवेशनावर ही दिंडी धडकणार आहे. दिंडीत काल्पनिक वंचित प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकड्यांवर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासनमान्य विनाअनुदानित शाळेत सेवेत असलेले अनेक वर्षांपासूनच्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने अनुदान दिले असल्याने ते 2005 पूर्वी काही टक्के तर नंतर काही टक्के टप्पा अनुदानाला पात्र ठरले आहेत.

मात्र, त्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असल्याने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, अशी मागणी होत असून यासाठीच हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. वंचित शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी गुरुवारपासून सेवाग्राम (वर्धा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पायी दिंडीला सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनात या मागणीची दखल न घेतल्यास सभागृहात व बाहेर ही तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार दराडे यांनी दिली.

या पायी दिंडीत नाशिक विभागाचे शिक्षक किशोर आमदार दराडे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील सहभागी झाले आहेत. त्यांच्या समवेत शिक्षक संघटनाचे कल्याण बर्डे, अनंतराव गर्जे, डॉ. रवींद्र पानसरे, विजय येवले, सचिन नेलवडे, रामचंद्र मोहिते, समाधान घाडगे, मारुती गायकवाड, शंकर वडने, प्रमोद देशमुख, मुकंद मोहिते आदी शाळा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. शिक्षकांना न्याय देण्याची आमची मागणी आहे.
किशोर दराडे (आमदार, शिक्षक नाशिक विभाग)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!