Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिक्षक दिनविशेष : शिक्षक आणि उपक्रम

Share
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा अखेर संपुष्टात !, Latest News Teacher Service Problems Sangmner
देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत.
विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन शिकवितात तेच शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आवडतात. विद्यार्थ्यांना नेहमी आनंदी ठेवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. पण बहुतांश ठिकाणी असे पाहायला मिळते की, शिक्षक विद्यार्थ्यांवर चिडचिड करतात, रागावतात आणि प्रसंगी शिक्षा देखील करतात.
अश्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना खूप भीती वाटते आणि विद्यार्थी शिक्षकांच्या जवळ जाण्यासाठी घाबरतो. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी भीती किंवा राग असेल तर विद्यार्थ्याची प्रगती म्हणावी तशी होत नाही. तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळा आणि शिक्षण याविषयी लळा निर्माण होते. अर्थातच त्यांची शाळेतील उपस्थितीदेखील वाढते आणि शिक्षणाच्या प्रवाहातून शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होण्यास मदत मिळते.
माजी शिक्षण संचालक आणि शिक्षणतज्ञ मा. वि. वि. चिपळूणकर हे शिक्षकांनी उपक्रम करत राहावे असे म्हणत. शिक्षकांचा आणि समाजाचा खूप जुना संबंध आहे. पूर्वीच्या काळी गावात शिकलेला एकच व्यक्ती राहत असे आणि तो म्हणजे शाळा मास्तर. शिक्षकांच्या शब्दाला त्या काळीमान होता तसा मान आज मिळत नाही तरी देखील चांगल्या शिक्षकांची समाजात आजही वाहवा होतांना दिसून येते. शिक्षकांच्या वर्तनावर त्याचे शालेय आणि समाजातील स्थान निर्माण होते. म्हणून शिक्षकाने शाळेत आणि समाजात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी चांगले वर्तन करणे आवश्यक आहे.
शाळेतील लहान लहान मुले आपल्या प्रत्येक बाबीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. शिक्षकांचे प्रत्येक वर्तन मुलांसाठी एक दिशा देत असते. आज शिक्षक दिन आहे म्हणजे शिक्षकांचा गौरव आणि सन्मान करण्याचा दिवस.
काही उत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्लीला, राज्यपालांच्या हस्ते मुंबईला तर जिल्हा स्तरावर देखील पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. ज्यांना पुरस्कार मिळाले तेच आदर्श शिक्षक असून बाकीचे काही कामाचे नाहीत, असे नाही.
सर्वच शिक्षक आदर्श आहेत, जे मुलांसाठी नेहमी धडपड करतात, मुलांना नवनवीन गोष्टी शिकवितात, मुलांना नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवतात. सक्षम देशाच्या उभारणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे, हे प्रत्येक शिक्षकांनी लक्षात घेऊन उद्याचा सक्षम नागरिक करण्याकडे लक्ष द्यावे.
नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!