शिक्षक परिषदेचा 13 डिसेंबरला नागपूरला मोर्चा

0

जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 13 डिसेंबरला नागपूरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातून शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.
राज्य शिक्षक परिषदेच्या प्रांत कार्यकारिणीची सहविचार सभा शिक्षकभवन, पुणे येथे झाली. या सभेत शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सभेत प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, आमदार नागो गाणार, संजीवनीताई रायकर, भगवान साळुंखे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब काळे, प्रांत कार्यालयीन मंत्री व नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित आदी उपस्थित होते.
बैठकीत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रांत पदाधिकारी नोव्हेंबरअखेर इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती बोडखे यांनी दिली. त्यानंतर मोर्चाच्या नियोजन आणि शिक्षकांच्या मागण्याबाबत चर्चा झाली. यात शिक्षकांची अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागु करावी,
शासन निर्णयनुसार वरिष्ठ व निवड श्रेणीच्या संदर्भात जाचक अटी काढण्यात याव्यात, अन्यथा शिक्षक निवड श्रेणीपासून वंचित राहतील आणि घटनेने दिलेला अधिकार ते गमावून बसतील. 8 वर्षांनंतर वरिष्ठ व 18 वर्षानंतर निवडश्रेणी मुख्याध्यापक व शिक्षकांना विनाअट देण्यात यावी, नोव्हेंबर 2005 पासून शिक्षकेतरांचा आकृतीबंधाचा जो प्रश्न प्रलंबित आहे,
तो निकाली काढून शैक्षणिक गुणवत्तेचा होणारा त्रास तातडीने थांबविण्याच्या दृष्टीने शिक्षकेतरांचा आकृतीबंध त्वरित लागू करावा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्वरित 100 टक्के अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश राहणार आहे. शिक्षकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग प्रमुख सुनील पंडित यांनी केले आहे

LEAVE A REPLY

*