आठ दिवसांत शिक्षकांच्या बदल्या?

0
पेसा आणि अवघड क्षेत्रातील माहिती सरलवर भरण्याचे आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या 31 मे पूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होत असतात. यंदा राज्य पातळीवरून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी खास सॉफ्टवेअर देण्यात येणार असे सांगण्यात येत होते.
प्रत्यक्षात बदल्यांचा कालावधी संपण्यासाठी आता अवघा आठ दिवसांचा कालावधी बाकी असताना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सरल प्रणालीत जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा आणि आदिवासी भागातील शाळांची माहिती ऑनलाईन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. यामुळे येत्या आठ दिवसांत शिक्षकांच्या बदली प्रक्रिया होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा राज्य सरकारने जिल्हा परिषद पातळीवर होणार्‍या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून करण्याचा निर्णय घेतला. यासाठी अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी शाळेत जाण्यास अडचण आहे, अशा भागातील शाळांना अवघड क्षेत्रात वर्ग करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातही 364 शाळा अवघड क्षेत्रात आहे. असे असताना जिल्ह्यातील शिक्षकांनी मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संपूर्ण जिल्हा सर्वसाधारण करण्याचा ठराव घेतला. त्यानंतर घेण्यात आलेला ठराव राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिक्षक ग्राम विकास विभागाच्या फेबु्रवारी 2017 च्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणा विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. याच आदेशात मणके विकारग्रस्त शिक्षकांना सवलत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सुधारित आदेश काढून ही सवलत रद्द करण्यात आली आहे. या विरोधात शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या आहेत.

 सरल प्रणालीत राज्यातील शिक्षकांचा डाटा संकलित आहे. यात शिक्षकांचे रोस्टर, रिक्त जागाचा तपशील, कार्यरत जागांचा तपशील ऑनलाईन आहे. याच सरल प्रणालीत शिक्षकांच्या ट्रान्स्फर पोर्टल असल्याने ग्राम विकास विभागाला अत्यंत कमी वेळेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक बदल्या करत येणे शक्य असल्याचे शिक्षण विभागातील जाणकारांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*