Type to search

Featured सार्वमत

विस्थापित शिक्षकांना आज मिळणार पुनर्पदस्थापना

Share

बदल्यांमध्ये एनआयसीचा गुंता : अनेकांना फटका

अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या, गेल्यावर्षी बदल्यामध्ये विस्थापित होऊन रँडम राउंडमध्येे गेल्यानंतर न्यायालयात धाव घेतलेल्या, गेल्यावर्षी चुकीची माहिती देऊन बदली करून घेतलेल्या आणि आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना रविवारी रँडम राउंडमधून पदस्थापना देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांच्या उपस्थितीत रिक्त जागा दाखूवन समुपदेशनाने या बदल्या होणार आहेत.

दुसरीकडे एनआयसीने यंदा बदल्यांच्या प्रक्रियेत घोळ घातल्याने अनेकांना त्याचा फटका बसला आहे. बदलीसाठी दिलेल्या 20 शाळांपैकी दोन किंवा तीन शाळांमधील पदे रिक्त असताना अनेक शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. आता या शिक्षकांची रँडम राउंडमध्येे बदली करण्यात येणार असल्याने या शिक्षकांवर हा अन्याय असल्याचा आरोप शिक्षकांमधून करण्यात होत आहे.

रविवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील विस्तापित शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहेत. यात जवळपास 300 ते 325 शिक्षकांच्या बदल्या होणे अपेक्षीत आहे. सर्वप्रथम न्यायालयाच्या आदेशानूसार पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यानंतर यंदा विस्तापित झालेले शिक्षक यात प्राधान्याने शिक्षिका मग शिक्षक, त्यानंतर गेल्यावर्षी चुकीची माहिती देवून बदली करून घेतलेले शिक्षक आणि शेवटी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहेत.

शनिवारी जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या उपस्थितीत 14 गटशिक्षकांनी पदस्थापना करण्यात येणार्‍या शिक्षकांची कुंडली तयार केली. यात त्यांचा सेवा कालवधी, न्यायालयाच्या आदेश संबंधीतांना लागू आहे की नाही, गेल्यावर्षी चुकीची माहिती देणारे आणि आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता तपासण्यात आली.

गेल्यावर्षी एनआयसीने बदलीमध्ये 20 शाळांचा पसंती क्रम दिल्यानंतर सदर शाळेत पद असतांनाही संबंधीत शिक्षकांना विस्तापित केले होते. अशांची माहिती दिल्यानंतर 25 ते 30 शिक्षकांना लगेच दुसर्‍या शाळांमध्ये बदलीचे आदेश काढले होते. यंदा मात्र, गेल्यावर्षीचा नियम बाजूला ठेवून संबंधीत शिक्षकांना यंदाच्या विस्तापितांमध्ये बदली करण्याचा नियम लावण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संताप आहे. एनआयसी दरवर्षी वेगवेगळ नियम लावणार का? असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

यंदा देखील अनेक शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला हरताळ फासत चुकीच माहिती सादर करून बदल्या करून घेतल्या आहेत. यात पती आणि पत्नी यांच्या शाळांमधील अंतर हे 30 किलोमीटरपेक्षा जास्त असतांना त्यांच्या बदलीला मान्यता दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करणे सोडा, त्याची साधी खातरजमा शिक्षण विभागाने केलेली नाही. हा प्रकार प्रमाणिकपणे माहिती भरून गैरसोयीच्या बदलीस समोरे जाणार्‍या शिक्षकांवर अन्याय असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.

गतवर्षी चुकीच्या बदल्या झालेल्या शिक्षकांपैकी निम्मेच न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या शिक्षकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर देखील चुकीच्या बदल्या झालेल्या सर्व शिक्षकांऐवजी जे न्यायालयात गेलेले आहेत. त्यांच्या बदल्यांना यंदा शिक्षण विभागाने प्राधान्य दिले आहे. उर्वरित शिक्षकांनी देखील न्यायालयात जावे त्यानंतर त्यांना न्याय दिला जाईल, असा याचा अर्थ निघत असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!