शिक्षक भरती वादात सापडण्याची चिन्हे

0

शिक्षक भरती परीक्षेत गुण वाढवून देणार्‍या टोळ्या, पात्र उमेदवार धास्तावले

पुणे- राज्यात सहा वर्षांनंतर होणारी शिक्षक भरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. अभियोग्यता चाचणीतील पात्र उमेदवारांची संख्या परीक्षा परिषदेकडून वेगळी व महाआयटी विभागाकडून वेगळी दिली गेली आहे. त्यातच बारा ते पंधरा लाखांत गुण वाढवून देतो असे सांगणार्‍या ऑडिओ क्लिपही व्हारयल झाल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीतील तफावत ही टायपिंगमधील चूक आहे की आणखी काही मोठे रॅकेट याचा खुलासा लवकर होणे गरजेचे आहे.
मुख्य म्हणजे अभियोग्यता चाचणी ही आम्ही घेतली नसून आयटी विभागाने घेतली आहे. त्यामुळे त्याचे गुणांकनही त्यांनीच केले आहे, आम्ही केवळ परीक्षेचे नियोजन केले होते. आम्हाला गुणांची जी यादी मिळाली ती त्यांच्याकडूनच मिळालेली आहे.

त्यामुळे याबाबत आम्ही कोणताही अधिकचा तपशील देऊ शकणार नाही. अशा प्रकारच्या क्लिप्स काही नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडून खोडसाळपणे संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने केलेल्या असू शकतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. असे प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसात तक्रार द्यावी असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे येत्या काळात वीस हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यासाठी शासनाने नुकतीच अभियोग्यता चाचणीही घेतली. यासाठी राज्यातून 97 हजार 520 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

मात्र, त्यातील 1 लाख 71 हजार 348 उमेदवारांनी ही चाचणी दिली. या चाचणीचा निकाल 1 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, परीक्षा घेतलेल्या आयटी विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी व परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेली आकडेवारी यात चारशे पात्र उमेदवारांचा फरक दिसत असल्याचे समोर आले आहे. दोनशे गुणांच्या या चाचणीमध्ये 141 ते 160 या गुणांच्या गटात 450 विद्यार्थी पात्र आहेत, असे आयटी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर, याच गटात 850 विद्यार्थी पात्र असल्याचे परीक्षा परिषदेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

दरम्यान, आयटी विभागाकडून शून्य गुण मिळालेल्या उमेदवारांची यादीच जाहीर न केल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे.दरम्यान, याच कालावधीत तुम्हाला पवित्र प्रणालीमध्ये पात्र उमेदवारांच्या यादीत घालून देतो यासाठी बारा ते पंधरा लाख रुपये द्या असे संभाषण असणार्‍या काही ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या असून पात्र उमेदवारांची संख्या अचानक चारशेने वाढलेली दिसत असल्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.आकडेवारीतील जर टायपिंगमधील चूक असेल तर ती प्रशासनाने वेळीच समोर येऊन जाहीर करणे गरजेचे आहे; किंवा यामध्ये काही गौंडबंगाल असेल तर त्यांचा वेळीच खुलासा करणे गरजेचे आहे.

या प्रकारामुळे राज्यातील गेल्या सहा वर्षांपासून चातकाप्रमाणे शिक्षक भरतीची वाट पाहणार्‍या पात्र उमेदवारांना मात्र मोठी चिंता पडली आहे. त्यातच व्हारयल झालेल्या क्लिपमध्ये काही अधिकार्‍यांची नावेही आहेत. अनेक परीक्षांच्या दिव्यातून पुढे आल्यानंतर आता सीईटी 2010 प्रकरणासारखा घोळ तर शिक्षण विभाग घालणार नाही ना, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

*