शिक्षिकेने बदलीसाठी सादर केले बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र; गुन्हा दाखल

0
नाशिक । जिल्ह्याअंतर्गत बदलीसाठी शिक्षेकेने अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शासनाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुवर (रा. अनमोल नयनतारा सिटी, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वैशाली सुधाकर सोनवणे असे संशयित शिक्षिकेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे या नाशिक तालुक्यातील मुंगसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी सन 2017 ते 18 दरम्यान शासनाच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी ऑनलाईन अर्ज भरला होता; मात्र वैशाली सोनवणे यांनी फॉर्म भरताना अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत शासनाचे निर्देश असल्याचा फायदा घेण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडील अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतले व ते जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी शासनाला सादर केले.

दरम्यान, संबंधित विभागाने वैशाली सोनवणे यांच्या एकूणच कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात त्यांनी सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागूल करीत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेची शिक्षक भरती तसेच शिक्षक बंदल्यांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी बदली मिळविण्याचे प्रकार वेळोवळी घडत आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*