Type to search

Breaking News नंदुरबार

जि.प.च्या ७६ विषय शिक्षकांना पदोन्नती

Share

नंदुरबार – 

मुख्याध्यापक पदापाठोपाठ जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदवीधर शिक्षक पदासाठीची पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी.यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या 42 शिक्षकांची मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती करण्यात आली. आज झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत 76 शिक्षकांना विषय शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली.

गेल्या काही वर्षापासून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया झालेली नव्हती. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी लक्ष घातले व पदोन्नतीसह शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. त्यानुसार दि.15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मुख्याध्यापक पदाच्या रिक्त असलेल्या जागांसाठी पदोन्नती प्रक्रिया राबविली गेली. त्यात 42 शिक्षकांना पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून बढती देण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या विषय शिक्षक पदासाठी वेतनोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत 76 शिक्षकांची विषय शिक्षक या पदावर वेतनोन्नती करण्यात आली. यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेत पदोन्नती समितीच्या माध्यमातून पात्र शिक्षकांना थेट पदोन्नतीचे आदेश देण्याची पद्धत अवलंबिली जात होती.

मात्र, यावेळी थेट शिक्षकांच्या सहभागाने शिक्षकांसमोर पारदर्शक पध्दतीने पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली, हे या प्रक्रियेचे वैशिष्टय ठरले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार प्रलंबित असलेली चटोपाध्याय वेतनश्रेणीची 242 प्रकरणे आतापर्यंत निकाली काढण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांना द्यावयाच्या निवड श्रेणीची 121 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रकरणेही लवकरच मार्गी लावली जाणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख संवर्गाच्या जागा पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना कुठल्याही सेवाविषयक बाबींबाबत अडचणी असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधल्यास त्या तक्रारी त्वरित निकाली काढण्यात येतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला आहे.

पदोन्नती झालेल्या विषय शिक्षक व पदोन्नती मुख्याध्यापकांना नवीन जबाबदारीबाबत शुभेच्छा देऊन गुणवत्तापूर्ण कार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ही पदोन्नती तसेच विविध प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉ.युनूस पठाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी ए.डी.पाटील, मिलिंद जाधव, दिनेश वळवी, राहुल वसावे, सुनील गिरी, योगेश रघुवंशी यांनी जवाबदारी सांभाळली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!