राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राज्यातील खाजगी,स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,खाजगी आश्रमशाळा,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 5 वाजता राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर व 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वा.पर्यंत नागपूर विधानभवनासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने दिला आहे.
तशी निवेदने मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री आदिवासी विकासमंत्री,मुंबई यांना देण्यात आली आहेत. संघटनेच्या प्रमुख मागण्यांत केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील शिक्षक कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू कराव्यात,राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करणे,अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, वाढीव महागाई भत्ता थकबाकी विनाविलंब द्यावी, इयत्ता 6 वी ते 8 वीच्या शिक्षकांना हायस्कूल शिक्षकाची वेतनश्रेणी मंजूर करणे, 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना पुढील टप्पा देण्यात यावा.
महिला कर्मचार्‍यांना शिफारस केलेली 2 वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर व्हावी,केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना 1977 चा कायदा व 1981 च्या सेवाशर्ती प्रमाणे अंमलबजावणी करणे,शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंध निकष समितीच्या शिफारशी मंजूर करणे व अंमलबजावणी करणे,
अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता देणे शिक्षकेतर कर्माचार्‍यांना 1 वर्षाच्या सेवेनंतर दुसरी कालबद्ध पदोन्नती मंजूर करणे,नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एकस्तरीय पदोन्नती,अतिरिक्त घरभाडे भत्ता सरसकट सर्वाना मंजूर करावा.
शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागू करणे अपंग शाळामधील शिक्षकांना तारखेस वेतन मिळावे,इ मागण्याचे निवेदन मंडळाचे अध्यक्ष व मा.आ.व्ही यु डायगव्हाणे, कोषाध्यक्ष भारत घुले,सरचिटणीस व्ही जी पवार,या पदाधिकार्‍यानी दिले आहे.आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन चांगदेव कडू, अप्पासाहेब शिंदे, राजेंद्र लांडे, विजय थोरात यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*