Type to search

Featured सार्वमत

शिक्षक बँक संचालक मंडळात मतभेद नाहीत, रावसाहेब रोहोकले हेच मार्गदर्शक

Share

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून बँकेचा कारभार राज्याचे संपर्कप्रमुख व जिल्ह्याचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू राहील. बँकेचे पदाधिकारी निवडताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार संचालक मंडळाची वाटचाल पुढे सुरू राहील, अशी प्रतिक्रिया बँकेच्या संचालकांनी दिली आहे. शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीबाबत काल वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत मोठी चर्चा झाली. परंतु रोहोकले गुरुजी निवृत्त झाल्यामुळे व बँकेच्या व्हाईस चेअरमन सीमाताई निकम यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा रोहोकले गुरुजी यांच्याकडे सुपूर्द केल्यामुळे आता दोन्ही पदाच्या निवडी या त्यांच्या मार्गदर्शनानुसार होतील. शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. कोणताही वेगळा विचार कुणाच्याही ध्यानीमनी नाही. संचालक मंडळ पूर्णपणे एकसंध असून आतापर्यंत ज्याप्रमाणे बँकेचा कारभार पारदर्शकपणे झाला आहे, पुढील काळातही तो तसाच होईल. त्यामुळे विरोधकांनी याबाबत कोणतीही चिंता करू नये.

रावसाहेब रोहोकले यांच्या चेअरमनपदाबाबत बँकेचे जे कोणी सभासद न्यायालयात गेले आहेत, त्यासंदर्भात बँकेला कोणतीही माहिती नाही. त्या प्रकरणाशी बँकेचा किंवा संचालक मंडळाचा किंवा व्यक्तीगत रोहोकले गुरुजींचा कोणताही संबंध नाही, असा खुलासाही संचालक मंडळातर्फे करण्यात आला असून सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या संचालक मंडळाने केली असून उर्वरीत काळात ही अतिशय जबाबदारीचा कारभार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल. त्यामुळे या बाबत चुकीची चर्चा कोणी करू नये, असे मत बँकेचे संचालक दिलीप औताडे, सलीम खान पठाण, साहेबराव अनाप, किसन खेमनर, राजू राहणे, नानासाहेब बडाख, बाळासाहेब मुखेकर, गंगाराम गोडे, बाबासाहेब खरात, राजू मुंगसे, संतोष अकोलकर, अर्जुन शिरसाठ, विद्युलता आढाव, सीमाताई निकम, उषाताई साबळे, मंजूताई नरवडे, शरदभाऊ सुद्रिक यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख रावसाहेब सुंबे, आबासाहेब जगताप, संजय शेळके, बापूसाहेब तांबे व इतर सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली बँकेची देदीप्यमान वाटचाल अशीच सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!