Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरून सुंदोपसुंदी!

Share

तातडीने निर्णय न झाल्यास काही संचालक वेगळ्या भूमिकेच्या तयारीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीवरून सध्या सत्ताधारी गुरुमाऊली मंडळामध्ये रणकंदन माजले आहे. संचालकांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन या दोन्ही पदांच्या निवडी एकाचवेळी करण्याची मागणी मंडळाकडे केली आहे. परंतु विद्यमान व्हाईस चेअरमन सीमा निकम यांनी अद्याप पदाचा राजीनामा न दिल्यामुळे दोन्ही निवडी एकत्र करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान 31 मे रोजी बँकेचे चेअरमनपद रिक्त झालेले असताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आदेश देऊन सुद्धा अद्यापही चेअरमन निवडीचा कार्यक्रम उपनिबंधकांनी जाहीर न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षक बँक ही जिल्ह्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय राहिली असून सध्या बँकेच्या नूतन पदाधिकारी निवडीवरून सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू आहे. नुकतेच सेवानिवृत्त झालेले बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले यांना या पदावर शेवटपर्यंत रहावे असे वाटत असल्याने त्यांनी पारनेर तालुक्यातील एका शिक्षकाला उच्च न्यायालयात पाठवले आहे. मात्र बँकेच्या पोट नियमानुसार सेवानिवृत्त शिक्षकाचे बँकेचे सभासदत्व संपुष्टात आल्यामुळे संचालक अथवा पदाधिकारी म्हणून कोणत्याही पदावर राहता येत नाही. त्यानुसार रोहोकले निवृत्त झाल्यानंतर नूतन चेअरमनची निवड होणे अपेक्षित होते.

मात्र, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याबाबत पुढील योग्य कारवाई न केल्याने बँकेचा पदभार विद्यमान चेअरमन सीमाताई निकम यांच्याकडे देण्यात आला. मंडळाच्या आदेशानुसार त्यांची मुदत सहा महिन्याची होती. मार्च महिन्यांतच ती पूर्ण झाली. त्यांनी सुद्धा व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. 22 तारखेला झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत याबाबत सर्व संचालकांनी दोन्ही पदाच्या निवडी एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी गुरुमाऊली मंडळाचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्याकडे केली. त्यांनी सुद्धा या मागणीला होकार दर्शविला व निकम यांना राजीनामा देण्याचे संकेत दिले. मात्र, निकम यांनी अद्यापही राजीनामा न दिल्यामुळे दोन्ही निवडी एकत्रित घेण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

दरम्यान गुरुमाऊली मंडळाचे प्रमुख असलेले रावसाहेब सुंबे, संजय शेळके, आबासाहेब जगताप व बापूसाहेब तांबे यांनीसुद्धा बघ्याची भूमिका घेतली आहे. गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष असलेले बापूसाहेब तांबे हे सध्या सर्वच घडामोडींपासून अलिप्त आहेत. मात्र, इतर तिघे सुद्धा या प्रक्रियेबाबत फारसा रस दाखवत नसल्याने संचालक मंडळात नाराजीचा सूर आहे. निवृत्त चेअरमन रोहोकले यांचा सेवापूर्ती समारंभ 7 तारखेला होणार असून त्यानंतर 15 तारखेच्या पुढे पदाधिकारी निवडी घेण्यात याव्यात अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते. विद्यमान व्हाईस चेअरमन निकम यांचे पती शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राम निकम यांना राजीनामा देण्याचा आदेश होऊन देखील पुढील महिन्यात होणार्‍या संचालक मंडळाच्या सभेत राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच डीडीआर यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणून बँकेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम होता होईल तेवढा लांबविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत संचालक मंडळाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षात पदाधिकारी निवडीची कालमर्यादा कधीही पाळली गेलेली नाही. रावसाहेब रोहोकले यांचे नेतृत्व याबाबत कमी पडल्याचे दिसून येते.

पहिल्या वर्षी दिलीप औताडे यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले व एक वर्षानंतर संकेताप्रमाणे बदल करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सव्वा वर्षापर्यंत त्यांना कोणीच राजीनामा द्या म्हणून सांगितले नाही. त्यानंतर औताडे यांना राजीनामा देण्याचा आदेश होताच त्यांनी तात्काळ राजीनामा दिला. दुसर्‍या वेळी विद्युलता आढाव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र, दीड वर्ष त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यांना 9 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्या राजीनामा देत नसल्याने शेवटी संचालक मंडळाला त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करावा लागला, परंतु त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याही राजीनामा नाट्यावर पडदा पडला.

तिसर्‍यावेळी निकम यांना उपाध्यक्षपद देताना येथून पुढे प्रत्येकाला सहा महिन्यांची मुदत राहील असे सर्वानुमते ठरले. ऑक्टोबरमध्ये निवड झाल्यानंतर एप्रिलमध्ये त्यांची मुदत संपली. परंतु अद्याप त्यांनी राजीनामा दिला नाही. बँकेचा कारभार चांगला करीत असताना पदाधिकारी निवडीबाबत मात्र रोहोकले व गुरुमाऊली मंडळाचे इतर प्रमुख यांना निवडीचे वेळापत्रक पाळण्यात अपयश आले आहे. येत्या दोन दिवसांत व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा न झाल्यास संचालक मंडळातील काहीजण वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!