शिक्षक बँकेला जिल्हा परिषद देणार नोटीस

0

वसुली हमी का काढण्यात येऊ नये, याबाबत करणार विचारणा : माने

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत जिल्हा शिक्षक बँकेच्या कर्जाची वसुली जिल्हा परिषदेने थांबवावी असा ठराव झालेला आहे.
या बैठकीचे इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन शिक्षक बँकेला नोटीस देऊन कर्जाची वसुली का थांबवण्यात येऊ नये, अशी विचारणा करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी दिली.
मंगळवारी माने पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाची व्हिडीओ सिडी बँकेकडून मागवण्यात आलेली आहे. त्याआधारे गोंधळ घालणार्‍या शिक्षकांची ओळख परेड सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांकडून मिळालेल्या नावातून 13 शिक्षकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
त्यांचा खुलासा सात दिवसांनंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षण समितीच्या मासिक बैठकीत शिक्षक बँकेची वसुली जिल्हा परिषदेने बंद करण्याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यानुसार त्या बैठकीचे इतिवृत्त आल्यानंतर प्रशासन बँकेला नोटीस देणार आहे. जिल्हा शिक्षक बँकेची जिल्हा परिषदेमुळे शंभर टक्के वसुली होते. यातून बँकेला मोठा नफा मिळतो.
यामुळे या ठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी शिक्षक गोंधळ घालतात. यातून विनाकारण जिल्हा परिषदेची बदनामी होत असल्याचे माने यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे बँकेला नोटीस देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेने शिक्षक बँकेला वसुली करून देण्याचा करार करून दिलेला आहे, अशी विचारणा केल्यानंतर हा करार रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

आणखीन 15 शिक्षकांना नोटीस.. –
दरम्यान, शिक्षक बँकेने पाठवलेल्या सिडीतून सभेत गोंधळ घालणारे आणखीन 15 शिक्षकांची नावे समोर आली आहेत. या शिक्षकांना नोटीसा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शिक्षक बँकेत गोंधळ घालणार्‍या शिक्षकांची संख्या आता 28 वर पोहचणार आहे.

 

LEAVE A REPLY

*