Type to search

Featured सार्वमत

पत्नी एकत्रिकरणातील ‘त्या’ 42 शिक्षकांवर आठवड्यात कारवाई

Share

ऑनलाईन बदल्या; वेतनवाढ रोखण्यासह चालूवर्षी रँडम राऊंडमध्ये टाकणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने राज्य पातळीवर झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत चुकीची माहिती देणार्‍या 32 शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई प्रस्तावित केली आहे. या शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाणार आहे. तर पती-पत्नी एकत्रिकरणात सेवा आणि अंतराची चुकीची माहिती देणार्‍या ‘त्या’ 42 शिक्षकांवर चालू आठवड्यात कारवाईचानिर्णय घेण्यात येणार आहे. चुकीची माहिती देऊन गेल्यावर्षी बदली करून घेतलेल्या शिक्षकांना यंदा पुन्हा रँडम राऊंडमध्ये बदलीसाठी टाकण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या गेल्यावर्षी पहिल्यांदा थेट राज्य पातळीवरून ऑनलाईन पद्धतीने बदल्या झाल्या होत्या. त्यासाठी जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्याआधारे बदली पात्र शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे राज्यपातळीवरून संबंधित शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीची जिल्हा पातळीवर तपासणी करण्यात आली. यात चुकीची माहिती देणार्‍या संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले होते.

गेल्यावर्षी जून महिन्यात तीन टप्प्यांत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीची पडताळणी केली. कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. अशा शिक्षकांकडून खुलासाही मागवण्यात आला होता. खुलासा दिल्यानंतरही ज्या शिक्षकांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे, त्या शिक्षकांवर कारवाई करण्याच्या दिशेने जिल्हा परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. असे संवर्ग एकमध्ये अंपगत्वाची टक्केवारी 40 टक्क्यांपेक्षा कमी असणारे 32 शिक्षक आहेत.

दरम्यान संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणात बदलीचा लाभ घेतलेल्या 42 शिक्षकांच्या माहितीत तफावत आहेत. यात पती आणि पत्नीच्या शाळेचे अंतर कमी असताना ते जादा दाखविण्यात आलेले आहे. मात्र, हे अंतर कमी अथवा जास्त आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणता दाखला ग्राह्य धरावा हे राज्य सरकारने स्पष्ट केलेले नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुगल मॅप, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आणि स्वत: दुचाकीवर जवळच्या मार्गावरून पती आणि पत्नीच्या दोन शाळांमधील अंतर काढलेले आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांत पती-पत्नी एकत्रिकरणात एसटी महामंडळाचे दाखले ग्राह्य धरत या संवर्गातील बदल्याचा प्रश्न निकाली काढला आहे. मात्र, नगर जिल्ह्यात हा प्रश्न कायम असून चालू आठवड्यात यावर निर्णय घेण्यात येणार आहे. यासह पती अथवा पत्नी शिक्षक असून या दोघांपैकी एक सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठिकाणी सेवा करत असून असे असतानाही चुकीची माहिती सादर करून बदलीसाठी पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमाचा आधार घेत बदलीचा लाभ घेणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे 42 शिक्षक असून त्यांच्यावर चालू आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी सांगितले.

चालूवर्षीच्या रिक्त जागा आज कळणार
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून बदलीपात्र शिक्षक, रिक्त असणार्‍या जागा याची माहिती आज (सोमवारी) खुली करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते. आज बदली पात्र शिक्षकांची यादी खुली झाल्यानंतर खर्‍या अर्थाने बदलीसाठी शिक्षकांची धावधाव सुरू होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!