लक्ष्य पूर्ण न करणार्‍या बिजोत्पादन केंद्राची मान्यता रद्द करू

0

राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) – खासगी बियाणे निर्मिती कंपन्याच्या स्पर्धेत उतरण्यासाठी विविध पिकांचे दर्जेदार बिजोत्पादन सर्व बिजोत्पादन संस्था आणि कृषी विद्यापीठांनी घेणे गरजेचे आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाला महत्त्व द्या. जे बिजोत्पादन केंद्र दिलेले लक्ष्य पूर्ण करणार नाही, अशा बिजोत्पादन केंद्रांची मान्यता रद्द केली जाईल, अशी तंबी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे साहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. डी. के. यादव यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय बियाणे शास्त्र संस्था, मऊ, उत्तरप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने बिजोत्पादनाची राष्ट्रीय पातळीवरील बारावी वार्षिक आढावा बैठकीचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. यादव बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथा, डॉ. किरण कोकाटे, मऊ येथील भारतीय बियाणेशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. अशोक फरांदे, डॉ. मालविका ददलांनी, डॉ. मधुकर धोंंडे उपस्थित होते.

डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, अल्पभूधारक शेतकर्‍यांना त्यांच्या गरजेनुसार बियाणे मिळण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठात बियाण्याचे एटीएम असणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना उत्तम प्रतीच्या बियाण्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. बियाणे निर्मिती आणि संशोधनामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे.

यामध्ये देशातील डाळिंबाच्या क्षेत्रापैकी विद्यापीठाने विकसित केलेले डाळिंबाचे वाण 90 टक्के क्षेत्रावर घेतले जात आहे. देशातील कांदा उत्पादनापैकी 60 टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. देशातील हरभर्‍याच्या मुलभूत बियाण्यापैकी 15 टक्के मुलभूत बियाणे या कृषी विद्यापीठाचे असते.

याप्रसंगी डॉ. अग्रवाल यांनी मागील वर्षी देशातील बिजोत्पादनाचा आढावा सादर केला. प्रास्ताविक आणि स्वागत डॉ. शरद गडाख यांनी केले. यावेळी सर्वोत्कृष्ठ बिजोत्पादन केंद्र म्हणून बिरसा कृषी विद्यापीठ, रांची (झारखंड) यंाना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बैठकीस देशातील बिजोत्पादन केंद्राचे प्रमुख, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. विजय शेलार यांनी केले.

LEAVE A REPLY

*