तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडले

0
तळेगाव दिघे (वार्ताहर) – दुष्काळपिडीत तळेगाव भागातील 21 गावांना पाणीपुरवठा करणार्‍या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची वीज बिल थकबाकी 4 कोटी 28 लाख 39 हजार 380 रुपयांच्यावर पोहचली आहे. वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून योजनेला वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र चालू बिल भरण्याचे देखील नियोजन झाले नाही. अखेर महावितरणच्या अधिकार्‍यांनी थकबाकी वसुलीच्या कारणास्तव शुक्रवारी योजनेचा वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे लाभार्थी गावांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
तळेगाव भागातील 21 गावांना वरदान ठरलेली तळेगाव प्रादेशिक योजना आर्थिक नियोजनाअभावी आर्थिक अडचणीत सापडली आहे. वीज बिल थकबाकीची रक्कम मोठी असल्याने त्यावर येणार्‍या व्याजाची रक्कम महिन्यागणिक वाढत आहे. साहजिकच वीज बिल थकबाकीच्या रकमेत मोठी वाढ होत आहे. जून 2017 अखेर योजनेच्या निंबाळे येथील जॅकवेलच्या वीज कनेक्शनची थकबाकी 2 कोटी 55 लाख 30 हजार 460 रुपये, तर वडगावपान पंप हाऊसच्या वीज कनेक्शनची थकबाकी 1 कोटी 73 लाख 8 हजार 920 रुपये आहे.
वीजबिल थकबाकीची एकूण रक्कम 4 कोटी 28 लाख 39 हजार 380 रुपये इतकी आहे. त्यात चालू बिलाची भर पडणार आहे. दरमहा येणारे वीजबिल नियमित भरण्याचे नियोजन होत नाही. थकबाकी व चालू बिल वसुलीच्या कारणास्तव योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. दरमहा अकरा ते बारा लाख रुपये खर्च योजना चालविण्यासाठी येतो. महिन्याला साडेतीन ते चार लाख रुपये वीज बिल येते. मात्र पाच ते सहा लाख रुपयांचे देखील आर्थिक नियोजन होत नाही. ‘
खर्च अधिक अन वसुली कमी’ अशी स्थिती योजनेची बनली आहे. काही लाभार्थी गावे पाणीपट्टीच्या रकमा भरण्याबाबत उदासीनता दाखवितात. पाणी चोरी, अपव्यय, गळती, अनधिकृत नळजोड रोखण्याचे आव्हान योजनेसमोर आहे. त्यातच महावितरणकडून पावसाळ्यात वीज बिल थकबाकी वसुलीसाठी योजनेच्या निबांळे येथील जॅकवेल व वडगावपान पंपहाऊसचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडित केला.
त्यामुळे लाभार्थी 21 गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वीज पुरवठा खंडित केल्याने योजनेच्या साठवण तलावात पाणी असूनही ग्रामस्थांना निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी प्रादेशिक योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
त्यामुळे लाभार्थी गावांनी ठरवून दिलेल्या पाणीपट्टीच्या रकमा त्वरीत भरून भराव्यात. वीज बिल भरल्याशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही. त्यामुळे नळकनेक्शन धारकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*