तांभेरेचा तलाठी भडकवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

0

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील कामगार तलाठी कचरेश्‍वर भडकवाल याला सातबाराच्या उतार्‍यावर बोजा चढविण्यासाठी लाच मागितल्याच्या कारणावरून काल 11 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील लाच लुचपत विरोधी पथकाने सापळा लावून जेरबंद केला.
कचरेश्‍वर बाबुराव भडकवाल हा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहे. एका शेतकर्‍याच्या नावावर व त्यांच्या वडिलांच्या नावावर तांभेरे येथे शेती असून शेती सुधारण्यासाठी त्यांनी बँकेकडून काही कर्ज काढले. या कर्जाचा बोजा त्यांच्या नावावर असलेल्या सातबारा उतार्‍यावर चढविण्यासाठी तांभेरे येथील कामगार तलाठी कचरेश्‍वर बाबुराव भडकवाल यांनी त्यांच्याकडे 30 ऑगस्ट 2018 रोजी तिन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड अंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. त्या दोन हजार रुपयांची मागणी तलाठी भडकवाल करत होता.

मात्र, त्या शेतकर्‍याने अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाला संपर्क करून तक्रार केली. त्यानुसार नाशिक येथील पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पोलीस उप अधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, हवालदार तनवीर शेख, अशोक रक्ताटे, पोलीस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, महिला हवालदार राधा खेमनर यांनी दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजे दरम्यान राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठी भडकवाल हा लाचेची मागणी करत असताना सापळा लावून त्याला ताब्यात घेऊन गजाआड केले. कामगार तलाठी कचरेश्‍वर भडकवाल याला यापूर्वी दोन ते तीन वेळेस लाचलुचपत विभागाने पकडल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेने तालुक्यातील शासकीय व निम शासकीय कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच खळखळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*