Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कृमी दोष टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक – शीतल सांगळे

Share
सिन्नर | वार्ताहर 
पिण्याचे पाणी, अन्नपदार्थांची निष्काळजीपणाने हाताळणी केल्यामुळे कृमी दोष उद्भवतात. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता खुंटवणारा कृमी दोष हा आजार चिंताजनक असून या आजाराच्या निर्मूलनासाठी राबवण्यात येणाऱ्या जंतनाशक अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.
तालुक्यातील वावी येथे राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ ना. सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. बालके व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये कृमी दोष आढळतात. या दोषाचे उच्चाटन करण्यासाठी सदर अभियान राबविण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व महिला बालविकास विभागाच्या वतीने एकत्रितपणे संपूर्ण जिल्हाभर जंतनाशक मोहिम राबविण्यात येत असून आज (दि. 8) एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 1 ते 19 वयोगटातील बालके व किशोरवयीन यांना गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.
या गोळ्यांच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील आशा सेविकांचा या मोहिमेसाठी मोठा हातभार लागत असून त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे असल्याचे ना. सांगळे यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वैशाली झनकर यांनी आरोग्य व शिक्षण विभागाच्या योजनांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. जंतनाशक गोळ्यांचे सेवन शिक्षक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी …मुंडे यांनी मुलांनी मैदानी खेळ खेळले तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नाहीत याकडे लक्ष वेधले. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कुपोषणनिर्मूलन व माता-बालकांसाठीच्या अन्य उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
जंतनाशक मोहीम जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकत्रितपणे योगदान देत असून ही कौतुकाची बाब असल्याचे सांगत जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार यांनी आशा सेविकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करावे अशी विनंती नामदार सांगळे  यांना केली.
खरेदी-विक्री संघाचे संचालक विठ्ठल राजेभोसले, उपसरपंच विजय काटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत वावी परिसरातील वैद्यकीय असुविधांबाबत माहिती दिली. वावीच्या सरपंच नंदा गावडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, प्राचार्य अनिल वसावे यांच्यासह आरोग्य शिक्षण व बाल विकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
आरोग्य अधिकार्‍यांच्या रिक्त जागा भरणार 
वावी येथे आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. हा धागा पकडत दि.1सप्टेंबर पर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल असे ना. सांगळे म्हणाल्या. याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य अधिकार्‍यांच्या रिक्त असणार्‍या जागांचा प्रश्न चिंताजनक आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरवताना त्यामुळे प्रशासनाला दमछाक करावी लागते. शासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असून महिनाभरात बीएएमएस पदवीधारकांची रिक्‍त असणार्‍या जागांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामसेवकांच्या रिक्त पदांबाबतही जिल्हा परिषद स्तरावरुन योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नामदार सांगळे म्हणाल्या.
जिल्ह्यात साडेबारा लाख जंतनाशक गोळ्यांचे वाटप 
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे निमित्त साधून आज संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 19 वयोगटातील बालके व किशोरवयीन यांना सुमारे साडेबारा लाख जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तर सिन्नर तालुक्यातील एक लाख विद्यार्थी व किशोरवयीन या अभियानाचा लाभ घेणार आहेत. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सर्व ठिकाणी एकाच वेळी या गोळ्या सेवन करण्यात येतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली. आज गोळ्यांच्या लाभापासून वंचित राहिलेल्याना दि.16 ऑगस्ट रोजी लाभ दिला जाईल असे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!