नेवाशाच्या तहसीलदारांवर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

0

निंभारीत वाळू तस्करांचे कृत्य; पिता-पुत्रासह 8 जणांवर गुन्हे

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवाशाच्या तहसीलदारांसह महसूलच्या पथकावर जेसीबी घालून माझ्यावर खुनाच्या दोन केसेस चालू आहेत आणखी तिसरी होईल अशी भाषा वापरून धमकी दिल्याची घटना तालुक्यातील निंभारी-पाचेगाव रोडवर सोमवारी रात्री घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून निंभारीच्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तलाठी संभाजी भीमराव थोरात (वय 32) धंदा-नोकरी रा. नेवासा फाटा यांनी फिर्याद दिली असून त्यावरून सागर हरिभाऊ पवार व हरिभाऊ अंबादास पवार पत्ता माहित नाही व अन्य 6 जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर तामसवाडीचे तलाठी संभाजी थोरात, ए.डी. गव्हाणे, मंडल अधिकारी ए.जी.शिंदे यांच्यासमवेत शासकीय वाहनातून हे पथक निंभारीकडे निघाले. निंभारीतून पाचेगाव रस्त्याकडे जात असताना जाधव वस्तीजवळ डंपर पकडण्यात आला. चालक सागर हरिभाऊ पवार हा पळून गेला. पळून जात असताना त्याने पथकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर वाळू उपशाच्या ठिकाणी पथक गेले असता जेसीबी पळून जात असल्याचे निदर्शनास आले.

जेसीबीचा दुचाकीवरुन पाठलाग सुरु करण्यात आला. जेसीबी स्थानबध्द करण्यात आला. त्यानंतर पसार झालेला सागर पवार, हरीभाऊ अंबादास पवार यांच्यासह इतर व्यक्ती तीन दुचाकीवरुन आले. यावेळी पथकाला धमकावत तहसीलदार उमेश पाटील यांच्या अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून दुचाकी तिथेच सोडून रस्त्याच्या बाजूला उडी मारली. यावेळी जेसीबी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलीस बोलावूनही जेसीबी पळवून नेण्यात वाळूतस्कारांना यश आले. अवैध गौण खनिज पथकात श्री. शिंदे, गव्हाणे, कर्जुले, कोतवाल श्री. माळी, हिवाळे यांचा समावेश होता.

फिर्यादीत म्हटले की, 6 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास निंभारी ते पाचेगाव रोडवर यातील आरोपी सागर हरिभाऊ पवार, हरिभाऊ अंबादास पवार व इतर 6 जण यांनी शासकीय मालमत्तेवर दरोडा टाकून ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला व यातील आरोपी म्हणाले की, तुम्ही डंपर व जेसीबी सोडला नाही तर माझ्यावर दोन खुनाचे केसेस आहेत. तुम्ही जेसीबी सोडला नाही तर तिसरी केस होईल अशी धमकी देत जेसीबी प्रशासकीय अधिकारी यांचे अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

डंपरवरील चालक 18 लाख रुपये किंमतीचा जेसीबी घेवून निघून गेला. तर 9 लाख 75 हजार रुपये किंमतीचे डम्पर (एमएच 34 एम 5159 व साडेतीन ब्रास शासकीय मालकीची वाळू जप्त करण्यात आली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 462/2018 भारतीय दंड विधान कलम 307, 395, 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे करत आहेत. दरम्यान काल उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यात यश आले नव्हते.

 

LEAVE A REPLY

*