Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेवगावातील अतिक्रमणांवर तहसीलदारांकडून कारवाई

Share

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरात जाणार्‍या राज्यमार्गाच्या दुतार्फा व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणावर परिविक्षाधीन तहसीलदार अशिमा मित्तल यांनी हातोडा उचलण्याची कारवाई करून अतिक्रमणधारकांना धक्का देण्याचे काम केले. व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. या कारवाईमुळे व्यावसायिकांत नाराजी पसरली. मात्र वाहतुकीच्या कोंडीत सतत श्वास कोंडणार्‍या नागरिकांनी या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले.

नेवासा, नगर, गेवराई, पैठण, पाथर्डीकडे जाणारे राज्यमार्ग शेवगाव शहरामधून जातात. या परिसरात ज्ञानेश्वर, वृध्देश्वर, केदारेश्वर, गंगामाई हे साखर कारखाने, कापूस उत्पादनामुळे 15 जीनिंग प्रेसिंग व संलग्न व्यवसायाच्या संख्येत मोठी भर पडलेली आहे. शरातील विद्यालये, महाविद्यालयात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची वर्दळ या रस्त्यावरूनच असते. अतिक्रमणे व त्यासमोर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची सतत कोंडी व वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. या गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांचा कस लागतो. या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघाताचे तसेच वरचेवर होणार्‍या वाहतूक कोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यासंदर्भात सार्वजिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सूचना दिल्या. मात्र त्याचा परिणाम काहीच झाला नाही.

शेवगावात परिविक्षाधीन तहसीलदार अशिमा मित्तल यांनी तहसीलदाराचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातून फेरफटका मारताना वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. त्यांनी मिरी रोड, तिसगाव रोड, क्रांती चौक, नेवासा रस्त्यावरील गटारावर व त्यापुढे आलेली अतिक्रणे स्वत:हून काढून घेण्यास सांगितले. त्यानंतर काही व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. त्यातील काही व्यावसायिकांनी याला प्रतिसाद न दिल्याने दुकानांच्या बाहेरील अनधिकृत फलक, खांब, पत्रे जेसीबीने काढण्यात आली. तसेच क्रांती चौकात दुकांनावरील फ्लेक्सही काढण्यात आले.
या कारवाईत तहसीलदार मित्तल, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नायब तहसीलदार मयूर बेरड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, गुप्तवार्ता विभागाचे राजू चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन देशमुख, नगरपरीषदेचे अभियंता समाधान मुंगसे यांच्यासह नगरपरिषदेचे 20 कर्मचारी जेसीबी व इतर वाहनांसह सहभागी झाले होते.

शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नोटिसा काढणे, थातुरमातुर कारवाई करणे असे प्रकार अनेकदा घडले. मध्यस्थीमुळे प्रत्यक्ष कारवाई कागदावरच राहिली. मात्र भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी अशिमा मित्तल यांनी कारवाईला सुरुवात करून कर्तव्यदक्षता दाखवत सर्वसामान्य नागरिकांच्या अभिनंदनास पात्र ठरल्या आहेत. बर्‍याच वर्षापूर्वी अतिक्रमणे काढण्याची कारवाई तत्कालीन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केली होती. पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. पाच वर्षापूर्वी त्यावेळचे तहसीलदार हरीश सोनार यांनी नगरपरिषद होताना अतिक्रमण काढण्याची योजना आखली. मात्र लोकप्रतिनिधींनी खोडा घातला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!