स्वाईन फ्लूचे थैमान : सभापतींकडून अधिकार्‍यांची कानउघडणी

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यात स्वाईन फ्लू सदृश आजाराने थैमान घातले असून अवघ्या पाच महिन्यांत पाच जणांचे जीव गेले आहेत. तर 15 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 77 जण संशयित आढळल्याने पंचायत समितीमध्ये काल शनिवारी वैद्यकीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत सभापती व उपसभापती यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. आरोग्याच्या बाबतीत सर्तक राहण्याचे आदेश सभापतींनी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले.
मार्च 2017 ते जुलै 2017 या कालावधीत स्वाईन फ्लू सदृश आजाराने तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. याबाबत संगमनेर पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची तातडीने बैठक बोलविली. या बैठकीस सहायक गटविकास अधिकारी किशोर मराठे व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर उपस्थित होते. यावेळी सभापती कोकणे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना साथीच्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती विचारत चांगलेच धारेवर धरले. प्रत्येक वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दैनंदिन कामाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
बैठकीत स्वाईन फ्लू आजाराबरोबरच इतर साथीचे आजार कशाप्रकारे रोखता येतील व याबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत चर्चा झाली. यावेळी अनेक वैद्यकीय अधिकार्‍यांनी जागा रिक्त आहेत, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात यावा असा मुद्दाही चर्चेतून पुढे आला.
तसेच शवविच्छेदन करण्यासाठी एका गावातील ग्रामस्थ व पोलिसांनी दडपण आणल्याची व्यथा वैद्यकीय अधिकार्‍यांने मांडली. त्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात मतृदेह आणल्यास येथील वैद्यकीय अधिकारी सांगतात की, तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यास बोलवा, त्यावर उपसभापती नवनाथ अरगडे म्हणाले, याबाबत तुम्ही मला लेखी पत्र द्या, त्यावर आम्ही वरिष्ठांशी चर्चा करुन कारवाई करू, मात्र कामात कुणी चुकी केली तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
तालुक्यात स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागरण करणारे पत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. स्वाईन फ्लू सदृश आजाराला कुणी बळी पडू नये म्हणून प्रत्येक वैद्यकीय अधिकार्‍याने काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्यावतीने स्वच्छता मोहीम तसेच जंतुनाशक फवारणी मोहीम राबवावी असे आदेश सभापती कोकणे यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

*