अंतुर्ली येथे ‘स्वाइन फ्लू’चा संशयित रुग्ण आढळला

अंतुर्ली येथे ‘स्वाइन फ्लू’चा संशयित रुग्ण आढळला

येथून जवळच असलेल्या अंतुर्ली बुद्रूक येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, अंतुर्ली गावात एच1-एन1 बाधित रुग्ण आढळून आला असल्याचे समोर आले आहे. सदरील रुग्णाचे नाव नंदाबाई सुरेश पाटील (वय 60) असून, त्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

याबाबत पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रतीक भोसले, आरोग्य पर्यवेक्षक बी.एन.पांडे व आरोग्यसेवक पी.आर.पाटील यांनी आरोग्य पथकासह अंतुर्ली बु. गावाला भेट देऊन गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात केले. संशयित रुग्णाच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

संबंधित रुग्णाच्या घरात एकूण आठ सदस्य असून, त्यांची तपासणी केली असता, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला ताप अगर स्वाइन फ्लू व इतर आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत. असे असले तरी गावात आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांमार्फत नियमित दररोज प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकाने गावातील ग्रामस्थांना स्वच्छता ठेवण्याच्या व कोणीही घाबरून जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आदींनाही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून टीसीएल पावडर टाकूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, पाण्याची टाकी दर दहा दिवसांनी धुण्यात यावी, टाकीखालील परिसर स्वच्छ करण्यात यावा, व्हॉल्व्ह लिकेज काढण्यात यावा, गटारी व जलवाहिनी स्वच्छ करण्यात यावी, गटारींमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com