स्वाईन फ्लूचा जोर वाढला

0
नाशिक ।  जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू सदृष्य आजाराचे 9 रुग्ण दाखल झाले असून सर्व रुग्णांचे स्वॅब पुणे येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

वातावरणातील बदल आणि अस्वच्छतेमुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढलेला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात 7 पुरुष आणि 2 महिला अशा 9 रूग्णांवंर उपचार सुरु आहेत. तर यापुर्वी मागील महिनाभरापासून सुमारे 26 रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पंधरा दिवसांपुर्वी यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

गेली चार दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या 9 रूग्णांची वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल मंगळवारपर्यंत (दि.1) येणार असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.

मे व जून महिन्यात स्वाईन फ्लूचा जोर कमी झाला होता. महिनाभरापुर्वी रूग्ण नसल्याने जिल्हा रूग्णालयातील स्वाईन फ्लू कक्ष काही दिवस बंद होता. मात्र जुलैच्या प्रारंभापासून पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून रूग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

शहरासह निफाड, सिन्नर व इतर तालुक्यांमधील रूग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा सुरू झाला असली तरी तो आटोक्यात असल्याचा दावा वैद्यकीय सुत्रांनी केला आहे. तसेच नागरीकांनी स्वच्छता पाळत योग्य त्या खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

LEAVE A REPLY

*