जिल्ह्यात सात महिन्यांत स्वाईन फ्लूचे 35 बळी

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या साथीमुळे गेल्या सात महिन्यांत 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून 223 जणांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

नाशिक शहरात गेल्या तीन- चार महिन्यांत स्वाईन फ्लू व डेंग्यूने डोके वर काढले असून नुकताच दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या साथीने डोके वर काढले होते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमानात जसजशी वाढ होत गेली त्यानुसार रुग्णांचा आकडा वाढत गेला होता. यात अनेक रुग्णांकडून खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काही रुग्णांचा मृत्यू झाला होता.

हा आजार अंगावर काढल्यानंतर रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही जण दगावले होते. गेल्या सात महिन्यांत महापालिका व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी स्वाईन फ्लू संशयित असलेल्या 4 हजार 387 रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते.

साथीची तीव्रता लक्षात घेता महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालय व काही शहरी आरोग्य केंद्रात स्क्रीनिंगची व्यवस्था करीत रुग्णांच्या तपासणीनंतर त्यांच्यावर औषधोपचार केले आहेत. स्क्रीनिंग केलेल्या रुग्णांपैकी 522 रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे हे रुग्ण बरे झाले.

यात जिल्ह्यात 223 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 जानेवारी ते 31 जुलै 2017 या काळात स्वाईन फ्लूने 35 जणांचा मृत्यू झाला असून यात नाशिक महापालिका हद्दीतील 13 व 22 जण हे महापालिका हद्दीबाहेरील आहेत. याचबरोबर शहरात डेंग्यूने डोके वर काढले असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

*