नगरमध्ये 6 जणांना ‘स्वाईन’ची लागण

0

29 जणांचा मृत्यू ,  65 रुग्ण स्वाईन पॉझिटीव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जानेवारीपासून जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने थैमान घातले असून, जानेवारीपासून 29 जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. मध्यंतरी उन्हाळा असल्याने स्वाईन फ्ल्यूची साथ आटोक्यात होती. आता पावसाळा सुरु झाल्याने वातावरण ढगाळ व थंड आहे. अशा वातावरणात साथ फैलावण्याची शक्यता वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. घसा दुखी, ताप असणार्‍या रुग्णांनी तातडीने शासकीय आरोग्य सेवकांचा आधार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेर, राहाता, नेवासा, कोपरगाव, नगर, कर्जत, पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांचा समावेश आहे. ज्या दवाखंान्यात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण उपचार घेत होते, त्या डॉक्टरांना आरोग्य विभागातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षण करून स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसत असलेली रुग्ण शोधण्यात येत आहेत. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग झालेले 65 रुग्ण आढळले असून तब्बल 58 हजार 550 रुग्ण स्वाईन फ्ल्यू संशयित आहेत. स्वाईन फ्ल्यूयूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 389 रुग्णांनवरही प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहेत.

लक्षणे आढळलेल्या रुग्णाची तपासणी करून आवश्यक असल्यास त्याला टॅमी फ्ल्यू च्या गोळ्या देण्यात येत आहेत. लहान मुलांना सिरपच्या स्वरूपात औषध देण्यात येते. जे रुग्ण स्वाईन फ्ल्यू वर उपचार घेत आहेत, त्या रुग्णांच्या सोबत राहिलेल्या नातेवाईकांना टॅमी फ्ल्यू च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यात स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक गोळ्या उपलब्ध असल्या तरी नागरिक उपचारासाठी खाजगी दवाखान्यांचा वापर करत असल्याने आरोग्य विभागाची अडचण होत आहे. खाजगी दवाखान्यात गेल्यावर स्वाईन फ्ल्यूची लागण झालेली असल्यास रुग्णास उपचारासाठी शहरात पाठविण्यात येते. मात्र याची माहिती आरोग्य विभागाला लवकर मिळत नसल्याने अशा संशयित रुग्णांची माहिती मिळविताना मोठी कसरत होत आहे.

यासंदर्भात महानगरपालिका क्षेत्रातही नुकतीच खाजगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली होती. त्यातही सर्व सूचना देण्यात आल्या. स्वाईन फ्ल्यू ची एखाद्या नागरिकास लागण झाली की नाही? याची तपासणी रक्तनमुने तपासून होते. रक्तनमुने तपासण्यासाठी पुण्याला राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने पाठवावे लागतात. जिल्ह्यात तपासणी लॅब नसल्याने पुण्याहून तपासणी होऊन येण्यास उशीर लागतो. तोपर्यंत आजाराचे निदान होत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो. त्यामुळे जिल्ह्यात तपासणी लॅब होणे गरजेचे आहे.

बाधित रुग्ण व कंसात मृत्यूबाधित रुग्ण व कंसात मृत्यू –  संगमनेर 14 (7), राहता 12 (5),  नगर 6 (1),  कर्जत 2 (1),  कोपरगाव 6 (3),  नेवासा 6 (4),  पारनेर 2 (2),  शेवगाव 1 (0),  श्रीगोंदा 4 (0), श्रीरामपूर 8 (4) एकूण      65 (29).

नागरिकांनी काळजी घ्यावी –
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून स्वाईन फ्ल्यूचा फैलाव होण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. घसा दुखी, ताप ही लक्षण तीन ते चार दिवस असल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून उपचार करावेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक टॉमी फ्ल्यूच्या गाळ्या आणि पातळ औषध उपलब्ध आहे.
डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे स्वाईन फ्ल्यूचा नव्याने रुग्ण आढळून आला आहे. सध्या या रुग्णावर पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने तातडीने चिचोंडी पाटील परिसरात सर्वेक्षण करून अन्य सहवासीतांवर उपचार सुरू केले आहेत. 

LEAVE A REPLY

*