Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शपथ देश रक्षणाची !

Share

खडतर प्रशिक्षानंतर 185 जवान देशसेवेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) 36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 185 जवानांनी आज (शनिवारी देशनिष्ठेची शपथ घेतली. 212व्या शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत देशरक्षणाची व त्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करण्याचा संकल्प जवानांनी केला. या वेळी आपल्या मुलांना सैन्यामध्ये पाठवणार्‍या पालकांचा गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला.

शनिवारी सकाळी 212 व्या शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे आगमन झाले. पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांना, दुसरी सलामी कर्नल रसेल डिसुझा यांना तर तिसरी सलामी ब्रिगेडिअर वी.एस. राणा यांना जवनांनी दिली. लेप्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन यांनी मुख्य सलामी स्वीकारली. व संचलनाची पाहणी केली. त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) आणण्यात आले. सर्वांनी उभे राहून या ध्वजाला सलामी दिली.

धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली. त्यानंतर सर्वांत पुढे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तीन तुकड्या, त्याच्यामागे एमआयआरसीचे निशाण व बँडपथक आणि सर्वांत शेवटी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या उर्वरीत तीन तुकड्या अशा क्रमाने संचलन केले. संचलन झाल्यानंतर या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जवानांचा तसेच आपल्या मुलांना लष्करात पाठवणार्‍या पालकांचा अधिकार्‍यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सैनिक जीवनाला सुरुवात करीत असताना तुम्हाला आजूबाजूला अनेक गोष्टी, उदाहरणे दिसतील. त्यात जशा चांगल्या गोष्टी असतील, तशा वाईट गोष्टींचाही समावेश असू शकतो. मात्र, त्यामधून तुम्हाला नेमकी कशाची निवड करायची आहे, याची जबाबदारी तुमचीच आहे. आपले सैनिक जीवन यशस्वी करण्यासाठी, एक उत्कृष्ट सैनिक होण्यासाठी आजच दृढनिश्चय करा,असा सल्ला लेफ्टनंट जनरल इकरून सिंह घुमन यांनी जवानांना दिला.

मिश्रा बेस्ट रिक्रुट
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा मारुत मिश्रा बेस्ट रिक्रूट ठरला. त्यांचा ‘जनरल सुंदरजी गोल्ड मेडल’ देऊन गौरव करण्यात आला. तर, रिक्रूट पिंद्रल राजू व रिक्रूट रोहित कुमार यांना अनुक्रमे ‘जनरल के. एल. डिसूजा सिल्वर मेडल’ व ‘जनरल पंकज जोशी कांस्यपदक’ देऊन सन्मानित करण्यात आला. रिक्रूट दिलप्रीतसिंह यांना बेस्ट ड्रिल कॅडेट देऊन गौरविण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!