स्वामीनाथन आयोगाबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा

0

अण्णा हजारेः पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी घेतली अण्णांची भेट

पुणतांबा (प्रतिनिधी) – शेतमालाच्या भावाबाबद तसेच शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीबाबद केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
पुणतांब्यातीत शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी 11 वाजता श्री. हजारे यांची राळेगणसिध्दी येथे भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना ते बोलत होते. शिष्टमंडळात बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, प्रताप वहाडणे, विजय धनवटे, समाजसेविका सौ. कल्पना इनामदार या सहभागी होत्या. अण्णा हजारे यांनी पुणतांब्यातील शेतकर्‍यांकडून शेतकरी संपाबाबदच्या आतापर्यंत घडलेल्या घडामोडींची माहिती जाणून घेतली. शेतकर्‍यांनी एकजूट दाखवून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले, याबद्दल समाधान व्यक्त केले.
शेतकर्‍यांना कर्जमाफीची गरज होती मात्र नेहमी कर्जमाफी देणे कोणत्याही सरकारला शक्य नाही. त्यासाठी शेतमालाला हमीभावाबाबद तातडीने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. केंद्र सरकारने याबाबद लवकर निर्णय घेतला पाहिजे तसेच शेतीला नियमित वीज पुरवठा, पाणी तसेच शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर शेतकर्‍यांना संप करण्याची वेळ येणार नाही.
शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविले पाहिजे असेही सांगीतले. यावेळी सौ. कल्पना इनामदार यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी आपण 21 जूलै पासून पुणतांबा येथे बेमुदत उपोषणास बसणार आहोत याची माहिती तसेच मागण्यांबाबद निवेदन अण्णांना वाचून दाखविले. श्री. चव्हाण यांनी दूध दरवाढीचा फायदा शेतकर्‍यांपेक्षा खाजगी दूध संस्थानांच ज्यादा झाल्याचे निर्दशनास आणून दिले. नामदेव धनवटे, प्रताप वहाडणे यांनीही चर्चेत भाग घेतला.
शिष्टमंडळातील सर्वांनीच अण्णांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच 21 जूलैपासून पुणतांबा येथे सुरू होणार्‍या बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाच्या ठिकाणी अण्णांनी भेट द्यावी अशी विनंती केली. यावेळी मी सर्व प्रश्‍नांचा अभ्यास करून निर्णय कळविन असे आश्‍वासन अण्णा हजारे यांनी शिष्टमंडळास दिले.

 

LEAVE A REPLY

*