अकोलेत स्वाईन फ्लूचा तिसरा बळी

0

आरोग्य विभाग खडबडून जागा

अकोले (प्रतिनिधी)- तालुक्यात स्वाईन फ्लूचा फैलाव झपाट्याने होत असून काल तांभोळ (ता.अकोले) येथील युवकाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याने मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. सुरेश नामदेव हरणामे (वय-35) हा आजारी स्थितीमध्ये काल नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दगावला. जिल्ह्यातील बळींची संख्या आता 16 वर गेली आहे.

त्यापूर्वी त्याने अकोले येथे दोन खासगी दवाखान्यांत उपचार घेतले. मात्र त्याची प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हरणामे यांना दाखल केले गेले त्यांना स्वाईन फ्लूची लक्षणे सांगून रुग्ण उशिरा दाखल झाल्याने अगतिकता व्यक्त केली. दरम्यान अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागास अद्याप प्राप्त झालेला नाही.
यापूर्वी शकीला खलील शेख (वय 52,रा. समशेरपूर) यांचेही स्वाईन फ्लू ने निधन झाले तर लक्ष्मीबाई गोरख गोडसे (वय 51, रा. मोग्रस) यांचाही स्वाईन फ्लू ने घास घेतला आहे. तर मच्छींद्र संपत कोरडे (वय 43, रा. लिंगदेव) या रुग्णाचे पुणे येथे वास्तव्यास असतांना स्वाईन फ्लू ने निधन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांभोळ येथील सुरेश हरणामे हा कुटुंब प्रमुख दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे, आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावते, पौष्टिक व हिरव्या पालेभाज्यांचा आहार घ्यावा, धूम्रपान टाळावे, भरपूर पाणी प्यावे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अशाही खबरदारीच्या सूचनाही त्यांनी केल्या आहे. स्वाईन फ्लू ने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टेमी फ्लू च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या आजारपणा बाबतचा पूर्व इतिहास व अन्य माहिती जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे पाठविलेली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाला की नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान आरोग्य विभागामार्फत तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या बैठका घेण्याचे काम सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

*