नगर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’ पेटविणार ऊस भावाचा बॉयलर

0

28 सप्टेंबरला इंदोरी फाट्यावर ऊस व दूध परिषदेचे आयोजन

इंदोरी (वार्ताहर) – जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस व दूध परिषद घेणार आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामाचा ऊस दर उत्पादकांच्या म्हणण्यानुसार पदरात पाडून घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पॅटर्न राबवीत नगर जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्याआधीच स्वाभिमानी शेतकरी संघटना उस भावाचा बॉयलर उस उत्पादकांमध्ये पेटविणार आहे.

दूध उत्पादकांना किमान 25 रुपये लिटर भावाचे मोठे आंदोलन खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी केल्यानंतर सर्व उस उत्पादक शेतकर्‍यांच्या नजरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या येत्या गळीत हंगामातील उसाच्या पहिल्या उचलीकडे लागले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन त्यात गळितास जाणार्‍या उसाचा दर काय घ्यायचा याची रूपरेषा आखतात. ठरलेला भाव पदरात पडेपर्यंत कारखानदारांना उसाला कोयता देखील लावू देत नाहीत. राज्यात पश्‍चिम महाराष्ट्रानंतर नगर जिल्हा हा साखर सम्राटांचे नंदनवन म्हणून समजला जातो.

जिल्ह्यात चौफेर साखर कारखानदारीमुळे सत्ताकारणाचे चांगले मळे जिल्ह्यात फुलले आहेत. या मळ्यांमधूनच सत्ताधारी आपल्या बगलबच्चांना खुष करण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, विविध संस्थांची संचालक पदांची गाजरे दाखवितात व उस उत्पादकांच्या घामाचा थेंब त्या संस्थांमध्ये जिरवतात. त्यामुळे जिल्ह्यातील उस उत्पादकांना चांगला साखर उतारा देऊन देखील पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कमी दर मिळतो. याची सल खासदार राजू शेट्टी व ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांना प्रकर्षाने जाणवते.

नगर जिल्हा तसा विचारवतांचा व चळवळीचा वारसा असलेला जिल्हा. मात्र साखर सम्राटांचा उदय झाल्यानंतर येथील चळवळी व विचारवंत या साखर सम्राटांचे गुलाम झाले. या गुलामगिरीमुळेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले. मागील 5 ते 6 वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी ऊस भावाच्या आंदोलनाचा कोल्हापूर पॅटर्न पाहतात. मात्र नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांपुढे आंदोलन करण्यास कोणीही धजावत नसल्याने साखर सम्राटांचे फावते. याची नस ओळखून मागील गळीत हंगामातील भावासाठी श्री. सावंत यांनी कार्यक्षेत्रातीलच अगस्ति कारखान्याच्या गव्हाणीत उडी मारण्याचे आंदोलन हाती घेतल्यावर अगस्तीने 2500 रुपये भाव देण्याचे लेखी पत्रच श्री. सावंत यांना दिले.

या परिषदेस खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, राज्याध्यक्ष रविकांत तुपकर, महिला आघाडी अध्यक्ष रसिका ढगे, युवा अध्यक्ष हंसराज वडगुले, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे राज्याध्यक्ष अमर हिप्परगे, युवती अध्यक्ष पूजा मोरे, विद्यार्थी परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष शर्मिला येवले आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी व ऊस उत्पादकांनी या परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

आंदोलनामुळेच अगस्तीला जिल्ह्यात एक नंबरचा भाव द्यावा लागला. आंदोलन हेच जर यशाचे गमक असेल तर यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील जयसिंगपूरसारखी ऊस व दूध परिषद घेऊन उसाच्या पहिल्या उचलीचे आंदोलन कोल्हापूर पॅटर्नसारखे करायचे व आपल्या म्हणण्यानुसार भाव पदरात पाडून घ्यायचा अशी प्रतिज्ञा करूनच 28 सप्टेंबरला उस व दूध परिषदेचे इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयोजकांनी दिली.

LEAVE A REPLY

*