Video : सरसकट कर्जमाफीसाठी प्रहारचे आंदोलन

0
नाशिक । शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, उद्ध्वस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना विनाअट एकरी 25 हजार मदत द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान द्यावे. स्वामिनाथन आयोग लागू करावा. पेरणी ते कापणीच्या कामाचा मनरेगात समावेश करावा. कापूस, मका, सोयाबीन, तूर शेतमालाला आधारभूत भाव द्यावा.

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळावी. संत्री उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे.

कृषिपंपांचे वीजबिल माफ करून 24 तास वीज द्यावी यासह अन्य मागण्यांचा यात समावेश आहे. शासनाने मागण्यांसंदर्भात तात्काळ निर्णय घेतला नाही तर प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी दत्तू बोडके, अनिल भडांगे, जगन काकडे, शरद शिंदे, मधुकर कासार, उमेश शिंदे, प्रकाश चव्हाण, संतोष माळोदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*