‘स्वाभिमानी’च्या वादात खा. शेट्टींवर विश्‍वास

0
सुधाकर शिंदे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि संघटनेचे विद्यमान प्रमुख सदाभाऊ खोत यांच्यात अनेक मुद्यांवरून संघर्ष खदखदत आहे. खोत हे मंत्री झाल्यानंतर अलीकडच्या काळात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांच्या भूमिकेबाबत सरकारकडून चालढकल केली जात आहे. याच कारणावरुन आता खोत आणि खा. शेट्टी अशी दोन गट संघटनेत निर्माण झाले आहे. या दोन्ही नेत्यांच्या वादात मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा विश्‍वासाने खा. शेट्टी यांच्यासोबत उभा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकतेच नाशिक शहरात झालेल्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाला हजेरी लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी राज्यातील राजकारण तापविले आहे. आपले परम मित्र सदाभाऊ खोत हे मंत्री बनल्यानंतर ते संघटनेपासून दुरावल्याची भावना केवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांतच नाही, तर हीच भावना खा. शेट्टी यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखविली आहे. त्यामुळे आता संघटनेत फूट पडते की काय असे वातावरण अलीकडच्या घडामोडीनंतर दिसू लागले आहे. भविष्यात सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडतील, भाजपत जातील असे चित्र निर्माण झाले आहे.

त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आणि कर्जमुक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस निर्णय घ्यायला तयार नाही. या एकूणच पार्श्‍वभूमीवर खा. शेट्टी यांनी थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावत अप्रत्यक्षरित्या मित्र सदाभाऊ खोत आणि भाजपच्या नेतृत्वाला एक प्रकारे इशारा दिला आहे. शिवसेनेच्या अधिवेशनात खा. शेट्टी हे काही नवीन घोषणा करतील किंवा शिवसेनेसोबत जाण्याबाबत काही निर्धार व्यक्त करतील याकडे राज्याचे लक्ष लागून असताना खा. शेट्टी यांनी सावध पवित्रा घेतल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. केवळ येत्या २२ मेपासून आपण पुण्यातून मुंबईपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचे निमंत्रण त्यांनी शिवसेनेला दिले.
अधिवेशनच्या निमित्ताने सन २०१९ ची निवडणूक दूर नाही, शेतकर्‍यांला दुसर्‍यांदा फसविले तर ते मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खा. शेट्टी यांनी केवळ भाजप व मुख्यमंत्री फडवणीस यांनाच दिला नाही तर अप्रत्यक्षरित्या राज्यमंत्री खोत यांनाही दिला आहे. यावरून येणार्‍या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळेच खा. शेट्टी यांनी नाशिक दौर्‍यात उत्तर महाराष्ट्रातील निवडक पदाधिकार्‍यांची चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली. त्यात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे खा. शेट्टी यांच्यासोबत राहणार असल्याने जिल्ह्यात तरी संघटनेत फूट पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

*