Type to search

Featured सार्वमत

आता दोघांत तिसरा!

Share

नाराजीतून सुवेंद्र फडकविणार बंडाचे निशान

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंच्या विरोधात जाऊन जशी सुजय विखे यांनी लोकसभेच्या मैदानात उडी घेतली त्याच स्टाईलने आता खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र हे नाराजीतून बंडाचे निशान फडकविण्याची चिन्हे आहेत. बहुदा उद्या रविवारी त्याचा निर्णय होईल असे विश्वसनीय सुत्रांकडून समजले. दिलीप गांधी भाजपशी एकनिष्ठ असून ते सुवेंद्रला समजावत आहे, पण आता तो ऐकण्याच्या पलिकडे गेल्याची कुजबूज गांधी फॅमिलीतून ऐकू येत आहे. तसे झाले तर नगरमध्ये विखे-जगताप या दोघांत अपक्ष गांधी हे तिसरे युवा उमेदवार म्हणून नशीब अजमावण्याच्या शक्यता आहे.

नेत्यांची मुले त्यांच्या पालकांचे ऐकत नसल्याचा नवा पायंडा नगर जिल्ह्यातून सुरू झाला. मुलगा ऐकत नाही, म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ‘हताश’ होते, त्यामुळे विखे यांच्याप्रमाणेच खा. दिलीप गांधी देखील ‘हताश’ होण्याची शक्यता आहे. उद्या रविवारी होणार्‍या गांधी समर्थकांच्या मेळाव्यानंतर सुवेंद्र गांधी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. नगर लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसागणिख तापत असून अनेक ट्विस्ट समोर येऊ लागले आहेत. भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यामुळे गेल्या दहा वर्षापासूून सलग खासदार असलेले दिलीप गांधी आणि त्यांच्या समर्थकांत मोठी नाराजी आहे. खासदार दिलीप गांधी, लातूरचे सुनील गायकवाड यांचा पत्ता कट झाला असून खा. हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी), अनिल शिरोळे (पुणे) यांचाही पत्ता कट होण्याची चिन्हे आहे. महाराष्ट्रात तिकीट नाकारलेल्यांच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. त्यात पहिला बॉम्ब खा. गांधी टाकण्याची शक्यता आहे. मात्र हा बॉम्ब टाकताना त्याच्या झळा आपल्या स्वतःला बसणार नाहीत, याची काळजी ते घेण्याची शक्यता आहे. विखे यांचा डाव त्यांच्यावर उलटविण्याची तयारीचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे.

खा. गांधी यांनी रविवारी समर्थकांचा मेळावा बोलविला आहे. या मेळाव्यात ते काय भूमिका जाहीर करणार, हे गुलदस्त्यात असले तरी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. काही समर्थक खा. गांधी वेगळा निर्णय घेणार नाहीत, असे ठामपणे सांगत आहेत. मात्र हे सांगतानाच डॉ. विखे यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासमवेत वाढविलेली सलगी त्यांना खुपत आहे. आनंदधाम येथील भेटीत खा. गांधी यांच्याऐवजी डॉ. विखे यांनी राठोड यांना सोबत नेले. जैन समाजात राठोड यांच्यापेक्षा खा. गांधी यांचे वर्चस्व जास्त असतानाही जाणीवपूर्वक असे कृत्य केल्याची त्यांची भावना आहे. असे असले तरी खा. गांधी यांचे पुत्र सुवेंद्र हे वेगळी भूूमिका घेऊन अपक्ष निवडणूक लढतील तर खासदार दिलीप गांधी हे भाजपशी एकनिष्ठ राहतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.

वयोमानानुसार आपलेच घर योग्य
खा. दिलीप गांधी यांच्या समर्थकांशी याबाबत चर्चा केली. त्यातील एका समर्थकाने मार्मिक प्रतिक्रिया दिली. खा. गांधी यांनी खासदारकीच्या काळात विकासाची मोठी कामे केली. गावागावात संपर्क वाढविला. त्यामुळे उमेदवारीचा अधिकार त्यांचाच होता. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतला. पक्षाने आतापर्यंत खा. गांधी यांना भरभरून दिले आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत, पण त्यांच्या मुलालाही ते आवर घालू शकणार नाहीत. तोदेखील त्याचे निर्णय घेण्यास समर्थ आहे. त्यामुळे काय होते हे उद्याच कळेल असे या समर्थकाने ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले.

भेटी-गाठीत शिजलंय काय?
भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून डॉ. सुजय विखे हा निर्णय माझा वैयक्तिक असल्याचे सांगत आहेत. या निर्णयाशी माझ्या आईवडिलांचा काही संबंध नसल्याचे ते आवर्जून सांगतात. हीच भाषा खा. गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांच्या तोंडी दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी पाथर्डी, शेवगाव भागात त्यांनी भेटीगाठीही घेतल्या आहेत. उमेदवारी नाकारल्यानंतरच्या या त्यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. खा. गांधी तीनवेळा भाजपच्या चिन्हावर खासदार झालेले आहेत. त्यात दोनवेळा सलग झाले आहेत. 2004 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी असलेले (कै.) प्रा. ना. स. फरांदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. खा. गांधी समर्थक हाच धागा पकडत आहेत. खा. गांधी उमेदवार नसतील, तर भाजपचा उमेदवार या मतदारसंघात निवडून येत नाही, असा समर्थकांचा दावा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!