वकीलांना अपमानास्पद वागणूक ; पोलीस निरीक्षक ओमासे यांच्या निलंबनाची मागणी

0

संगमनेर वकील संघाचा डीवायएसपी कार्यालयावर मोर्चा

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. गिरीष मेंद्रे यांना संगमनेर शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संगमनेर वकील संघाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि. 4 ऑगस्ट रोजी अ‍ॅड. गिरीष मेंद्रे हे वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. संतोष इटप यांचे बंधुविरुद्ध झालेल्या फिर्यादीबाबत चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्याच्याशी बोलत असतांना पोलीस निरीक्षक ओमासे यांनी तुझे इथे काय काम आहे बाहेर निघ असे म्हटल्यावरुन अ‍ॅड. मेंद्रे यांनी मी वकील आहे, हे सांगूनही मी वर्दी घातली आहे, तु सिव्हील ड्रेसमध्ये आहे तुझ्यावर एफ. आर. आय करतो तु आत आरोपींमध्ये बस अशी भाषा करुन धक्काबुक्की केली.

घडलेली घटना अ‍ॅड. गिरीष मेंद्रे यांनी वकील संघाच्या पदाधिकार्‍यांना सांगितली. त्यानंतर संगमनेर वकील संघाने या घटनेचा निषेध नोंदविला. वकील हे ही कोर्टाचे ऑफिसरच असून पक्षकार अगर संबंधितांना भेटून त्यांच्यावरील कारवाईबाबत चौकशी करणेचा त्यांना कायद्याने व घटनेने अधिकार असतांना शहर पोलीस स्टेशन व विशेषतः पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे हे वकीलीबद्दल सतत अपशब्द वापरतात.

सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. या कारणावर वकील संघाने सदस्यांनी बैठक घेतली. पोलीस अधिकार्‍याची अशी अरेरावी सहन केली जाणार नाही. पोलीस अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत कोर्ट कामकाजात भाग न घेण्याचा निर्णय वकील संघाने एकमताने घेतला. त्यानंतर याबाबतचे निवेदन देण्यासाठी संगमनेर वकील संघाचे सर्व सदस्यांनी पोलीस ठाणे ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला.

उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांना वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर यांनी सविस्तर माहिती दिली. सदर पोलीस अधिकारी ओमासे यांची वर्तणूक चांगली नव्हती व नाही त्या उद्धट व अरेरावी वर्तनाचा वकील संघ निषेध करत आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. थोरात यांना देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर, उपाध्यक्ष गणपत गांडोळे, अ‍ॅड. प्रदिप मालपाणी, अ‍ॅड. बापुसाहेब गुळवे, अ‍ॅड. अ‍ॅड. दिक्षीत, अ‍ॅड. नईम इनामदार, अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, अ‍ॅड. दादाभाऊ वर्पे, अ‍ॅड. प्रकाश राहाणे, अ‍ॅड. बापुसाहेब गोंगे, अ‍ॅड. विठ्ठल गुंड, अ‍ॅड. आसिफ पठाण, अ‍ॅड. बी. जी. दिघे, अ‍ॅड. विवेक बोर्‍हाडे आदिंसह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

वकील संघाने कोर्ट कामकाजावर टाकलेला बहिष्कारल मागे घ्यावा, आपण सदर घटनेत दोन्ही बाजूकडील माहिती घेवून संबंधीत अधिकार्‍याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल असे आश्‍वासन डीवायएसपी अशोक थोरात यांनी वकील संघाच्या पदाधिकार्‍यांना दिले.

येत्या सोमवार पर्यंत जर निलंबन झाले नाही तर सोमवारपासून तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*