Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घरगुती रोजगाराच्या नावाखाली भामट्याने 53 महिलांना गंडवले

Share

सिन्नर । प्रतिनिधी

महिलांना घरबसल्या रोजगार मिळवून देण्याचा बहाणा करून 53 महिलांकडून प्रत्येकी 5 हजारांची अनामत गोळा करून अज्ञात उद्योजकाने अवघ्या आठ दिवसातच गाशा गुंडाळून धूम ठोकल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तब्बल 53 महिलांनी आज सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी त्या उद्योजकाच्या नाव, गावासह कुठलाही थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीशेजारील शंकरनगरमध्ये या उद्योजकाने त्याच परिसरात गाळा भाड्याने घेऊन कार्यालय थाटले होते. या परिसरातील दोघा-तिघांना या कार्यालयात नोकरी दिली होती. महिलांना घरबसल्या किराणा साहित्य देऊन त्याचे छोटे-छोटे पाकीट भरून दिल्यास दिवसाला दोनशे रुपये रोज देण्याचे आमिष या भामट्याने महिलांना दाखवले. काजू, बदाम यासारखा महागडा किराणा माल तुम्हाला द्यावा लागणार असल्याने उद्या काही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक महिलेला 5 हजारांची अनामत द्यावी लागेल, अशी अट त्याने घातली.

त्यासाठी काही महिला तयार झाल्या. त्यांनी 5 हजारांची अनामत दिल्याने या भामट्याने त्या महिलांना प्लॅस्टिक पिशव्या पॅक करण्यासाठी सीलिंग मशीन व वजनासाठी छोटा काटाही दिला. सातशे-आठशे रुपयांचे मशीन व 200-250 चा वजन काटा असा जवळपास हजार रुपयांचा ऐवज मिळाल्याने महिलांचा विश्वास बसला. त्यानंतर त्याच्या कार्यालयातील दोघांनी आधी अनामत दिलेल्या 5-6 महिलांच्या घरी दोन-तीन किलो मनुके, दोन किलो खडीसाखर, 10 किलो रांगोळी असे साहित्य पोहोचवले.

या महिलांनी 10-20 ग्रॅमची पाकिटे बनवून दिल्यानंतर दोन नोकर पाकिटे गोळा करून घेऊन गेले व महिलांना संध्याकाळी दोनशे रुपये रोख देऊन गेले. असे 7-8 दिवस चालल्याने महिलांचा विश्वास बसला. आपल्यालाही काम मिळावे यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली. पहिले काम मिळालेल्या महिलांनी आपल्या मैत्रिणींना सांगितल्याने या घरबसल्या रोजगाराची परिसरात चांगलीच चर्चा झाली.
दरम्यान, रक्कम भरल्यानंतर तीन-चार दिवस होऊनही घरापर्यंत माल येत नसल्याने चौकशी केली असता या उद्योजकाचे बिंग फुटले. त्याचे कार्यालय उघडे असले तरी भ्रमणध्वनी मात्र ‘नॉट रिचेबल’ असल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

आपल्या परिसरात नवा उद्योजक आल्याची व तेथे महिलांची गर्दी उसळल्याचे कळल्यानंतर मला शंका आली. मी रामचंद्र नरोटे यांच्यासमवेत संबंधित उद्योजकाला भ्रमणध्वनी केला. त्याची भेट घेण्यासाठी निरोप दिले. दोन-तीन दिवसांनी संबंधित उद्योजक प्रत्यक्ष भेटीला आला. त्याचे नाव, गाव विचारत आधारकार्डसह सर्व कागदपत्रे घेऊन या, पोलीस व्हेरिफिकेशन करून घेऊ, असे त्याला सांगितले. एक-दोन दिवसात कागदपत्रे घेऊन येतो म्हणत या उद्योजकाने थेट मोबाईल बंद केला. त्यामुळे महिलांना घेऊन पोलिसांत तक्रार दिली आहे.
-श्रीकांत जाधव, नगरसेवक

कार भलत्याच्याच नावावर
हा उद्योजक सुरुवातीला तीन-चार दिवस स्वीफ्ट कार (क्र. एम.एच.12/ए. एक्स. 7763 व टोयाटा कार एम.एच.-04/डी. डब्ल्यू. 4726) घेऊन येत होता. नाशिकच्या गंगापूररोडला राहत असल्याचे व स्वतःचे नाव रवी काळे असल्याचे सांगत होता. आपल्यासोबत सुमित काळे व आकाश काळे हे दोघे भाऊदेखील राहत असल्याचे तो सांगत होता. त्याच्या मोबाईलवरून काही महिलांचे त्याने आपल्या पत्नीशी बोलणेही करून दिले होते. पत्नीचे नाव पूनम असल्याचे तो सांगत होता. मात्र त्याने दिलेले तीनही मोबाईल चार-पाच दिवसांपासून बंद आहेत. कारच्या नंबरवरून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता स्विफ्ट पिंपरी चिंचवड येथील प्रल्हाद भंडारी यांच्या नावावर तर टोयाटा पूनम पालके यांच्या नावावर नोंदवल्याचे उघड झाले आहे.

‘त्या’ बँक खात्यावर भिस्त
या महिलांना किराणा माल पोहोचवण्याचे व रोजाचे पैसे देण्याचे काम कार्यालयात रोजंदारीवर ठेवलेल्या दोघांकडे भामट्याने सोपवले होते. दररोज द्यायचे पैसे तो दोन-तीन दिवस रोख देत होता. मात्र एक दिवस देण्यास रोख पैसे नसल्याने त्यातील एका सेवकाच्या बँक खात्यात त्याने सहा हजार रुपये ट्रान्सफर केले होते. त्या बँक खात्यावरून व शिंदे येथील टोलनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रिकरण पाहून भामट्याचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अडीच लाखांना चुना
गोरा-गोमटा, घार्‍या डोळ्यांचा सुमारे 6 फूट उंचीच्या या भामट्याने सर्वांना भुरळ पाडली. स्वत:चे खरे नाव, गाव न सांगता हॉलमार्क पापड असा रबरी शिक्का मारून कोर्‍या व्हाऊचरवर स्वाक्षरी करून महिलांना त्याने पगाराचे तिकीट लावून पावती दिली आहे. त्यावर भरवसा ठेवत तब्बल 53 महिलांकडून प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 2 लाख 65 हजार रुपये घेऊन त्याने अवघ्या आठ दिवसांत गाशा गुंडाळला. 5-6 महिलांना त्याने प्लॅस्टिक पॅकिंगचे मशीन व काटा दिला तर 5-7 महिलांना 7-8 दिवसांचे हजार-पंधराशे रुपये मिळाले असले तरी जवळपास अडीच लाख घेऊन भामटा पसार झाला आहे. शंकरनगरपाठोपाठ पाथरे, शिर्डी भागातही त्याने आपला हा गोरखधंदा वाढवल्याची चर्चा असून फसवणूक झालेल्या महिलांची संख्या वाढू शकते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!