ताई, खड्ड्यातला प्रवास कसा, बोल बोल बोल..; सुळे यांना थेट सवाल

0

 संग्रामकडे कटाक्ष टाकत आंदोलनात सहभागी होण्याचे दिले आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- खड्ड्यातून धक्के खात आम्हाला कॉलेजात यावे लागते. तुम्हीही त्याच खड्ड्यातून आलात, तुम्हाला कसं वाटत? असा थेट सवाल नगरच्या विद्यार्थिनीने खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. पाणी नाही, ठिकठिकाणी कचरा साचला आहे यासह नागरी सुविधांचा बोजवारा शहरात उडाला असे सांगत कॉलेजियन्सनी सुळे यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. सुळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाहत त्यावर थेट उत्तर देणे टाळले पण समस्या सोडविण्यासाठी युनिटी तयार करा, राष्ट्रवादीचे शहरातील नेते त्याचा पाठपुरावा करतील असे सांगून सुळे यांनी वेळ पडल्यास मी स्वत: आंदोलनात तुमच्यासोबत सहभागी होईल असे आश्‍वासन दिले.

‘जागर युवा संवाद’ या कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे यांनी आज नगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये कॉलेजियन्सशी संवाद साधला. माजी आमदार दादा कळकम, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले, युवक प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष कुमार वाकळे, प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठारे, मंजुषा गुंड, अ‍ॅड.शारदा लगड यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

आदर्शनगरमधील मुलीने सुळे यांना तुम्हीही खडड्यातून प्रवास करत येथे आलात, कसं वाटतं असा थेट सवाल केला. तसेच आमच्या परिसरात पिण्याचे पाणी येत नाही. आले तरी त्याची वेळ नियमित नाही, आंदोलने केली, निवेदने दिली मात्र त्याचा उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त केली. खडड्यातून प्रवास कसा वाटला यावर सुळे यांनी उत्तर देणे टाळले मात्र या समस्या सोडविण्यासाठी निवेदने द्या, महापौरांची वेळ घेऊन त्यांची भेट घ्या, पत्र द्या, त्यांनी भेट न दिल्यास मला सांगा, मी तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी होईल असे आश्‍वासन दिले.
नेत्यांना बाजुला करत सुळे यांनी कॉलेजियन्सशी थेट संवाद साधला. अनेकांनी शहरातील समस्यांचा पाढा वाचला. प्रत्येकवेळी सुळे या संग्राम जगताप यांच्याकडे पाहत. त्यावेळी जगताप यांनी महापालिकेत आपली सत्ता नाही. आपल्या नगरसेवकांनी आंदोलने केली आहेत असे सांगितल्यानंतर सुळे यांनी समस्यांचे खापर महापालिकेच्या माथी फोडले. समस्या सोडविण्यासाठी युनिटी तयार करा. त्या माध्यमातून पाठपुरावा करा, आंदोलने करा, आमच्या पक्षाचे स्थानिक नेते त्याचा पाठपुरावा करतील, महापौरांना भेट टाळली तर मला सांगा, तुमच्यासोबत मीही आंदोलनात सहभागी होईल असे आश्‍वासन सुळे यांनी दिले. प्राचार्य डॉ.झावरे यांनी सुळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे महाविद्याच्यावतीने स्वागत केले.

जिंकण्याचा आनंद घेऊ
अनेक वर्षे राज्यात आमची सत्ता होती. आता ती गेली आहे. सत्तेत असल्याने अनेक वर्ष आम्हाला जिंकण्याचा आनंद घेता येत नव्हता. मात्र आता आम्ही विरोधात आहे. हारल्यावर जिंकल्याचा आनंद काय असतो तो येत्या 2019 मध्ये नक्कीच दिसून येईल. तेव्हा आम्ही जिंकून दाखवू असे खासदार सुळे म्हणाल्या.

छेडछाडमुक्त कॉलेजची संकल्पना
छेडछाडीच्या घटनांमुळे मुलींचे शिक्षण हे बंद झाले आहे. जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन ‘छेडछाड मुक्त कॉलेज’ हा उपक्रम सुरू करावा. या उपक्रमात मुलांना सहभागी होऊन जिल्हा छेडछाड मुक्त करावा असा प्रस्ताव खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉलेजियन्ससमोर ठेवला. महिलांना आता जागृत होण्याची वेळ आली आहे. अनेक मुलं-मुली मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया वापरतात. अनेक जण सेल्फी काढतात. फोटो काढा पण आपल्या जगण्या मध्ये बदल करा. नगरची राज्यात एक वेगळे ओळख निर्माण झाली आहे. अत्याचारांच्या घटनांमुळे नगरची प्रतिमा ही खराब होत आहे.

सीएमची भेट घेणार
पारनेर तालुक्यातील एका मुलीने प्रवासात आजही छेडछाड काढली जाते. बसची सुविधा नाही. स्थानिक लोक मध्यस्थी करून वाद मिटवतात. त्यामुळे पोलिसांत गेलो नसल्याचे सांगत असुरक्षितता कथन केली. त्यावर सुळे यांनी याकडे गांर्भीयाने पाहिले जावे असे सांगत अशा मुलींचे शिष्टमंडळ घेऊन सीएमची भेट घेणार असल्याचे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

अनेक ठिकाणी गर्भपात करून मुलींचा जन्म टाळला जातो. पाण्यात बुडून, गाळ्यास नख लावून मारले जाते. देशातील महिलेवर अनेक वेळा अत्याचार केले जातात. काही वेळेस अशा घटनाच्या विरोधात मोर्चे, आंदोलने काढली जातात. काही महिलांना न्याय मिळतो तर काहींना न्याय मिळत नाही. – रुपाली गिरवले

अधंश्रध्देमुळे महिलांवर अत्याचार होतात. अनेक वेळा या घटना घडल्यानंतर मोर्चे काढले जातात. काही लोक रस्त्यावर मेणबत्ता घेऊन उतरतात. त्यांचा प्रकाश हा फक्त रस्त्यावर पडतो. हा प्रकाश आता त्या लोकांच्या डोक्यावर पडण्याची गरज निर्माण झाली आहे. – निखील नगरकर

 

LEAVE A REPLY

*