तूरडाळ वितरणाबाबत पुरवठा विभाग संभ्रमात; अवघे 56 टक्केच नियतन प्राप्त

पुरवठा विभागाने मागवली तालुकानिहाय मागणी

0
नाशिक । सरकारने खरेदी केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांत 55 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्याला 4 हजार 927 क्विंटल तूरडाळ मंजूर झाली.

मात्र जिल्ह्याला 65 टक्के तूरडाळीचे नियतन दिल्याचे सांगितले गेले परंतु प्रत्यक्षात 56 टक्केच तूरडाळ प्राप्त झाल्याने वितरणाबाबत पुरवठा विभागातच संभ्रम निर्माण झाला आहे. तरीदेखील जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तहसीलदारांकडून मागणीचे प्रस्ताव मागवले आहेत.

राज्यात 2016-17 च्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली होती. यामध्ये राज्य शासनाने स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 25 लाख 25 हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तुरीच्या भरडाईस राज्य सरकारने परवानगी दिली होती.

ही भरडाई केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून रास्त भावात विक्रीसाठी काढण्यास राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली. त्यानुसार ही तूरडाळ आता प्रतिकिलो 55 रुपये दराने शिधापत्रिकाधारकास मिळणार आहे. जिल्ह्यातील 7 लाख 57 हजार 71 शिधापत्रिकांसाठी पुरवठा विभागाने 7 हजार 571 क्विंटल डाळीची मागणी केली होती. परंतु सुरुवातीला 56 टक्केच डाळ मिळाली आहे.

मागणीच्या 35 टक्के कमी डाळ मिळाली असली तरीही मागणीनुसार डाळ उपलब्ध होणार आहे. किती डाळ हवी त्यासाठीचे प्रस्ताव आता तहसीलदारांकडून मागितले जात आहेत. त्यानुसार ते शासनाला पाठवले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली.

25 किलोच्या पिशवीद्वारे वितरण : डाळ जिल्ह्यास प्राप्त झाली आहे. आता वाहतूकदारांकडून ती दुकानदारांना पाठवण्यात येणार आहे. ही डाळ 25 किलोच्या पिशव्यांद्वारे वितरित केली जाणार असून 25 किलोच्या पिशवीप्रमाणे 17 हजार 188 पिशव्यांद्वारे डाळ दुकानदारांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर ती लागलीच ग्राहकांनाही वितरणाचे आदेश आहेत.

LEAVE A REPLY

*