Type to search

Breaking News Featured उद्योग नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सुपेकर यांचा सन्मान; विघटनशील सॅनेटरी नॅपकिन उत्पादन प्रकल्पाची केंद्राकडून दखल 

Share

नाशिक । प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील वावी येथील रविंद्र भाऊसाहेब सुपेकर यांना आज दि.९ दिल्लीत झालेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दिव्यांग असणाऱ्या व विघटनशील सॅनेटरी नॅपकिन उत्पादनासंदर्भात प्रकल्प चालवणाऱ्या  सुपेकर यांना पाच लाख रुपये रोख पारितोषिक असणारा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार देण्यात आला असून गेल्या तीन वर्षांत हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन उद्योजक ठरले आहेत.

शारीरिक अपंगत्वावर मात करत सुपेकर यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. स्त्री स्वाभिमान सॅनेटरी नॅपकिन उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेत यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.

ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य या विषयावर काम करताना दोन वर्षांपूर्वी सुपेकर यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने पर्यावरणपूरक व विघटनशील असणाऱ्या नॅपकिन्सची निर्मिती केली. केंद्र सरकारच्या योजनेतून या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध असून जिल्हयातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून किशोरवयीन मुली व महिलांना या नॅपकिन्सचे वितरण करण्यात येत आहे.

सुपेकर यांच्या या उपक्रमाची दखल घेत केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने सन २०१९ च्या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारासाठी दिव्यांग श्रेणीतील विशेष पुरस्कारासाठी निवड केली होती. पुरस्कारांच्या ब श्रेणीतील पर्यावरण पूरक वस्तू निर्माता गटातून  5 लाख रुपये, चषक आणि प्रशस्तिपत्र पुरस्कार स्वरूपात सुपेकर यांना सन्मानित करण्यात आले.

विभागाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णन, सह सचिव सुनिता संगी, ज्योत्स्ना सिटलींग यांच्या उपस्थितीत दिल्लीतील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

सुपेकर यांच्यासह देशभरातील सुमारे ३५ उद्योजकांना यावेळी गौरविण्यात आले. कापड, कापड सामुग्री, शेती, अन्न प्रक्रिया, वनोत्पादन, खाद्यवस्तू आदी 13 उद्योग क्षेत्रांतील नवउद्योजकांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!