Type to search

Featured सार्वमत

सुपा औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत स्फोट

Share

सहा जण जखमी; शुभम् एंटरप्रायजेसमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमधील शुभम् एंटरप्रायजेस प्रा. लि. कंपनीत मंगळवारी सकाळी भीषण स्फोट होऊन यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. चार जणांना सुपा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असून दोघांना नगर येथे हलविण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीमधील शुभम् एंटरप्रायजेस या कंपनीमध्ये ऑईलची निर्मिती केली जाते. जुने टायर भट्टीत वितळून त्यावर प्रक्रिया करून हे ऑईल तयार होते. मंगळवारी सकाळी दैनंदिन कामकाज चालू झाल्यानंतर 8 ते 8.30 दरम्यान सिस्टीममध्ये गॅस तयार होऊन भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, छतावरील पत्रे उडाले. यामध्ये मोहन सहाने, कमलेश सहाने, लालदेव सहाने, वॉचमन राजाराम बबन चेडे (वय-55, रा. हंगा ता. पारनेर) जखमी झाले. नगर येथे हलविण्यात आलेल्या जखमींची नावे समजू शकली नाहीत.

कंपनीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये छोटे-मोठे उद्योग आहेत. या कंपन्यांमध्ये कामगारांचा विमा उतरवला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. कंपनीमध्ये कंत्राटी कामगार भरले जातात. यामध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आहेत. स्थानिक व परप्रांतीय हे सर्व कॉण्ट्रॅक्ट बेसेसवरील कामगारांकडून 12 तासांचे काम करून घेतले जाते. यापूर्वी देखील अशा अनेक घटना या औद्योगिक वसाहतीमध्ये घडल्या आहेत.

अग्निशामक गाडी देखील सुपा औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध नसल्याने एखादी भीषण आग लागल्यानंतर अहमदनगर किंवा शिरूर या ठिकाणाहून बंब बोलवावा लागतो. औद्योगिक वसाहतीसाठी दोन स्वतंत्र अग्निशामक गाड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी कामगारांसह ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान शुभम् एंटरप्रायजेस कंपनी ही एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्याने हे प्रकरण जागीच दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच त्यांच्याकडे जखमी कामगारांची नावे देखील उपलब्ध नव्हते.

पोटाच्या खळगीसाठी जीवघेणी कसरत
चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. कुटुंब साभाळायचे म्हणून राजाराम यांनी कंपनीत काम पाहिले. दोन अडीच महिन्यांपूर्वी या कंपनीत वॉचमन म्हणून कामाला सुरुवात केली. 12 तास काम करून आठ हजार पगार मिळत होता. पोटाची खळगी भरण्यासाठी अशी जीवघेणी कसरत असेल, तर ते कामच आम्हाला नको.
– सरस्वती राजाराम चेडे, राजाराम कामगाराची पत्नी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!