आधी उन्हाचे चटके तेव्हा मिळते शिक्षण!

0
सुपा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे मुसळधार पावसाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत पडून दीड महिना उलटला. मात्र अद्याप दखल घेण्यात आली नसून विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके सोसून उघड्यावर शिक्षण घेण्याची नामुष्की आली आहे.
सुपा परिसरात राजकीय पदाधिकारी मात्र राजकारणात दंग असून या प्रश्‍नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यावर पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नगर-पुणे महामार्गावरील सुपा शहरापासून अवघ्या 3 किमी अंतरावरील वाळवणे गावातील जिल्हा परिषद शाळेची भिंत ऑगस्ट महिन्यात पडली. इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत 105 विद्यार्थी व 4 शिक्षक आहे. शाळेची इमारत सन 1951 सालातील बांधकाम आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने दि.29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री इमारतीची भिंत कोसळली.
वाळवणेचे सरपंच उत्तम पठारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ दरेकर यांनी शाळेची इमारत पाहून सर्व वर्ग बाहेर बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उच्चस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. दरम्यान इमारत निधीसाठी शाळेने स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला.
यातून ग्रामस्थांनी 17 हजार रुपये शाळेसाठी दिले. एकीकडे ग्रामस्थ शाळेसाठी प्रयत्नशिल असताना प्रशासनाच्या उदासिनतेचे चित्र आहे.
दरम्यान शाळा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.बी. धुपद, सुपा केंद्राचे केंद्रप्रमुख साबळे तसेच शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके यांनी शाळेस भेट देऊन माहिती घेतली. पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या.
मात्र त्यानंतर राजकीय पुढार्‍यासह प्रशासनाने तोंड न दाखवल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच उत्तम पठारे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन पठारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ दरेकर, युवा सेना प्रमुख सुभाष थोरात, ग्रामपंचायत सदस्य नितीन दरेकर, संतोष पठारे, दादा दानवे, माजी उपसरपंच रामदास काळे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार दरेकर, सुरेश काळे,राजू पठारे, केंद्रप्रमुख बाळासाहेब साबळे यांच्यासह शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाली असल्याची माहिती पारनेर पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी यांना आठ महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. सदर इमारत 65 वर्षांची असून जीर्ण झाली आहे. भिंतीमधील दगड व माती जमिनीवर पडत असून शाळेच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाने याचे गांभीर्य घेतले नसून निंबोडी दुर्घटनेची पारनेरमध्ये वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल पालकांसह ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास शाळा बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
– उत्तम पठारे (सरपंच, वाळवणे)

तालुक्यातील एकूण 53 शाळा खोल्या धोकादायक असून सुपा केंद्रात वाळवणे, शहाजापूर, व हंगा येथील खोल्या धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसण्याचे आदेश दिले आहेत. शाळा खोल्याचा नवीन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले असून लवकर निर्णय होतील, असा आशावाद सुपा केंद्रप्रमुख बाळासाहेब साबळे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*