सुजित झावरेंना डावलून राष्ट्रवादीची कोअर कमिटी!

0

बंडखोरांनी थोपटले दंड : निघोजमध्ये नाराजांची बैठक : तालुकाध्यक्ष बदलणार  

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसमधील बंडखोरांनी तालुका नेतृत्वावर घणाघाती टीकास्त्र सोडत सुजित झावरे यांना वगळून राष्ट्रवादी कोअर कमिटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपदही लवकरात लवकर बदण्यात यावे, अशी एकमुखी मागणी पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकरराव उचाळे, औद्योगिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी केली आहे.
कृषी समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या अध्यक्षस्थानी निघोजमधील भैरवनाथ पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला अशोक सावंत, दीपक पवार, सोमनाथ वरखडे, उमेश सोनवणे, बाळासाहेब इकडे, इंद्रभान गाडेकर, विक्रम कळमकर, अरुण घनवट, अप्पासाहेब कळमकर, भाऊसाहेब लटंबळे, विजय खंदारे, नानासाहेब वरखडे, भाऊसाहेब लामखडे, बाळासाहेब लामखडे, दत्ता लाळगे, विजय वराळ, शिवाजी भुकन यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याबैठकीत पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्यामुळे मिळाले असून माझ्या महामंडळ निवडीशी सुजित झावरे यांचा काडीमात्रही संबंध नाही. उलट याच सुजित झावरेंनी महामंडळ पदास विरोध केल्याने दोन वर्षे महामंडळ पद उशिरा मिळाले.
पारनेरसह जिल्ह्याच्या राजकारणात सुजित झावरे हा माझ्या बोटाला धरून आला असून पहिल्या पंचायत समिती तिकीटास स्व. वसंतराव झावरे यांचा विरोध होता. तरीही माझ्या आग्रहाखातर स्वर्गवासी वसंतराव झावरेंनी सुजितला उमेदवारी दिली. परंतु आता स्वर्गवासी वसंतराव झावरे व स्व. गुलाबराव शेळके यांची राष्ट्रवादी तालुक्यात राहिली नसल्याची खंत तालुक्यातील कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचा आरोप अशोक सावंत यांनी बैठकीत केला आहे.
तसेच तालुक्यातील सर्वच महत्वाची पदे वडुले गावाला दिली असून तालुक्यातील बाकीची गावे काय नष्ट झाली की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाकी गावांमध्ये नाहीत, असाही सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी विक्रम कळमकर व उमेश सोनवणे यांनीही सुजित झावरे यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली असून झावरेंनी पक्षाच्या नावाखाली चाललेली आपली दुकानदारी बंद करावी व पक्षाला काळिमा फासणारे कृत्य करू नयेत, अशी तोफ डागली.

निवडणुका कोअर कमिटीच्या निर्णयानुसार होणार –
पारनेर तालुका राष्ट्रवादीतील नाराजांकडून तालुका नेतृत्वावर टीकास्त्र सुरू असून निघोजमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांच्या बैठकीत सुजित झावरेंना डावलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सुजित झावरेंना वगळून स्थापन करण्यात येणार्‍या कोअर कमिटीकडूनच यापुढील निवडणुका होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*