Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजळगावात तरुण डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या

जळगावात तरुण डॉक्टरची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव

बसस्थानकानजीकच्या महात्मा गांधी उद्यानामागील एका खासगी दवाखान्यात प्रॅक्टीस करणारे डॉ.विजय नारायण जाधव (वय 26, रा.सिल्लोड) यांनी रिंगरोड परिसरामधील त्यांच्या भाड्याच्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

डॉ.विजय जाधव यांचे शिक्षण बीएएमएस होते. ते अगोदर भुसावळ आणि मागील दीड वर्षांपासून जळगावात खासगी दवाखान्यात प्रॅक्टीस करीत होते. तसेच ते सध्या चैतन्य मेडीकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करीत होते. बसस्थानकामागील एका खासगी दवाखान्यात ते नाइट ड्युटीला होते. तर रिंगरोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोरील गल्लीतील भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या खोलीत अजून एक डॉक्टर मित्र राहत होता.

परंतु, तो सुमारे 10 दिवसांपासून बाहेर ट्रेनिंगला गेलेला होता. त्यामुळे खोलीत डॉ.विजय जाधव एकटेच होते. दुपारी साधारणत: 3 वाजेपासून त्यांच्याशी मित्रांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळेे त्यांच्या खोलीत पूर्वी राहत असलेले डॉ.गणेश पाटील (कांचननगर) हे डॉ.जाधव यांच्या खोलीवर गेले. खोलीचा दरवाजा बंद होता. आवाज देवून व दरवाजा ठोठवून देखील आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नजीकचे काही जण तेथे गेले. त्यातील एकाने खिडकीच्या फटीतून आत डोकावून पाहिले असता डॉ.जाधव फॅनला लटकलेल्या स्थितीत किचिंतसे दिसले. त्यामुळे तेथील नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. डॉ.जाधव यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात येताच काही जणांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

एमडीचे स्वप्न अपूर्ण
या घटनेबाबत डॉ.जाधव यांच्या मित्रांना कळताच त्यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. तर या मित्रांनी डॉ.जाधव यांच्या आठवणी सांगत आक्रोश केला. त्यांना एमडी सर्जन होण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी ते जिद्दीने अभ्यास, तयारी करीत होते, असे त्यांचे मित्र डॉ.सागर पाटील (पनवेल), डॉ.संतोष भालेराव यांनी सांगितले. शवविच्छेदन गुरुवारी सकाळी होणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.त्यांच्या पश्चात आई, शिक्षक वडील, भाऊ, भावजायी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या