सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

0

वाळकी येथील घटना : तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

राहाता (तालुका प्रतिनिधी) – सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. विवाहितेचा मृतदेह नातेवाईकांनी राहाता पोलीस ठाण्यातच ठेवला. मृत विवाहितेचा पती व सासर्‍यास अंत्यविधीसाठी पाठवा अन्यथा पोलीस ठाण्याच्या आवारातच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता. अखेर आत्महत्येस भाग पाडल्या प्रकरणी सासरच्या मंडळी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा पेच सुटला. यानंतर पोलीस बंदोबस्तात मृतदेह वाळकी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

याबाबतची माहिती अशी की, वाळकी येथील विवाहिता मनीषा अनिल शिरोळे (वय 35) हिने रविवारी रात्री विष प्यायल्याने तिला शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच तिचे निधन झाले होते. मृत मनीषाच्या सासरकडील लोकांनी मनीषाने विष घेतल्याने तिला शिर्डीच्या दवाखान्यात दाखल केल्याचे तिचा मावस मामा नंदकिशोर एकनाथ वाणी यांस दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता मोबाईल वरुन सांगितले. नंतर लागलीच पाच मिनिटांनी ती मरण पावल्याची कल्पना दिली. या प्रकारानंतर मनीषा हिचे धानोरे येथील नातेवाईक शिर्डी रुग्णालयात गेले.

शवविच्छेदन राहाता येथे न करता, लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात करण्याचा आग्रह नातेवाईकांनी धरला. अखेर लोणी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह वाळकी येथे न नेता राहाता पोलीस ठाण्यात आणला. अंत्यसंस्कारासाठी मृता विवाहितेचा पती अनिल शिरोळे व सासरा साईनाथ शिऱोळे यांना पाठवा, आम्ही पाहुणे आहोत. अंत्यसंस्कारासाठी तिच्या घरची माणसे हवीत. ही भूमिका धानोरे येथील नातेवाईकांनी घेतली. हा पेच रात्री उशिरापर्यंत न सुटल्यामुळे शववाहिनी पोलीस ठाण्याच्या आवारात उभी होती. सकाळी 10 वाजेपासून मृत मनीषा शिरोळे हिचे नातेवाईक राहाता पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मनीषा शिरोळे ही तिच्या आईस एकुलती एक मुलगी होती. या दोघींचा सांभाळ मामांनी करून मनिषाचे लग्नही मामा सूर्यभान बाबूराव दिघे यांनी6 मे 2001 रोजी वाळकी येथील अनिल शिरोळे याच्याबरोबर लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर वर्षभरांनी मनीषा हिचा सासरची मंडळी पैशाच्या मागणीवरुन छळ करीत होती.

याबाबत दहा वर्षापूर्वी राहाता पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलेला होता. सामोपचाराने पुन्हा नांदविण्यास पाठविले. त्यानंतर 1 आक्टोंबर 2014 रोजी मनीषाचा पती अनिल शिरोळे यास दीड लाख रुपये दिले. तरीही मनिषा हीस सासरकडील मंडळी पैशासाठी मानसिक व शारिरीक त्रास देत असल्यामुळेच तिने विष घेऊन आत्महत्या केली असल्याची लेखी फिर्याद मनीषाचा मामा सूर्यभान बाबुराव दिघे यांनी दिल्यावरुन राहाता पोलिसांनी मनिषाचा पती अनिल शिरोळे, सासरा साईनाथ बाळाजी शिरोळे, सासू सुशीलाबाई साईनाथ शिरोळे, दीर वाल्मिक साईनाथ शिरोळे यांच्या विरुध्द आत्महत्येस भाग पाडल्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला. पती व सासर्‍यास अटक करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*