ऊस टंचाईमुळे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस पळवापळवीचे संकेत

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – ऊस गाळप हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपलेला असताना या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांना उसाची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाच्या पळवापळवी संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यात डॉ. विखे, भाऊसाहेब थोरात, संगमनेर, अगस्ती, कोपरगावचे संजीवनी व काळे कारखाना, श्रीरामपुरचा अशोक कारखाना, नेवाशाचा ज्ञानेश्‍वर, मुळा, श्रीगोंद्यातील श्रीगोंदा, कुकडी, पाथर्डीचा वृद्धेश्‍वर, गणेश हे सहकारी साखर कारखाने गाळपास सज्ज दिसत आहेत. त्याचबरोबरीने अंबालिका, प्रसाद शुगर, जयश्रीराम, साईकृपा, साईकृपा फेज-2, युटेक हे खासगी कारखानेही गाळपास सज्ज आहेत. बंद असलेला राहुरीचा डॉ. तनपुरे कारखानाही गाळपासाठी या हंगामात सुरू करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे व सहकारी देत आहेत.
सर्व 21 खासगी व सहकारी कारखान्याचे गाळप व्यवस्थित पार पाडण्यासाठी कमीतकमी 1 ते सव्वाकोटी टन उसाची आवश्यकता आहे. परंतु मृगाच्या पहिल्या पावसानंतर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. उन्हाळ्यात कमी पडलेले पाणी यातून मोठ्या प्रमाणावर उसाच्या उत्पादनात घट येण्याची चिन्हे आहेत. यातून उसाची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
ऊस पळवापळवीसाठी प्रसिद्ध असलेल्या राहुरीच्या उसावर सर्वांचाच डोळा असणार आहे. तालुक्यात सरासरी दरवर्षी चांगले पाणी व इतर बाबी उपलब्ध असताना 18 ते 20 लाख टन उपलब्ध असतो. परंतु यावर्षी राहुरीत साधारण 8 ते 9 लाख टन उपलब्ध दिसत आहे. उपलब्ध उसातील बराच ऊस पुढे चांगला पाऊस झाल्यास बेण्यासाठी लागणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच कारखान्याबरोबर जिल्ह्याबाहेरील भीमाशंकर, दौंडशुगर, घोडगंगा, विघ्नहर आदी कारखान्याचे अधिकारी ऊस नेण्यासाठी येतात. यावर्षी या कारखान्याचेही ठिकठिकाणी भेटी देण्याबरोबरच शेतकर्‍यांना चांगला भाव, चोख वजन देण्याचे आश्‍वासन देऊन ऊस देण्याचे आवाहन करीत आहेत.
राहुरीचा साधारण दोन ते अडीच लाख टन ऊस दरवर्षी प्रवरेला नियमितपणे देणारे शेतकरी विखे गटाचे कार्यकर्ते प्रवरेला ऊस देणारच! याशिवाय संजीवनी, कोळपेवाडी, मुळा, अशोक, संगमनेर, आदींना ऊस नियमितपणे देणारे शेतकरी आहेतच! प्रसाद शुगर तालुक्यातला असल्याने त्यांनाही नियमितपणे आपला कारखाना म्हणून ऊस घालणारे शेतकरी आहेतच! एकूण 3 लाख टन हक्काचा ऊस त्यांना मिळेल, असे दिसत असताना बंद पडलेला राहुरी सुरू करून आशा निर्माण झाली तरी कारखान्यास ऊस मिळेल का? मागील अनुभवामुळे विश्‍वास ठेवतील का? हा प्रश्‍न आहेच!
आपला कारखाना, कामधेनू या विचारापलिकडे त्रस्त शेतकरी आता आपल्या अर्थधकारणाचा, अडचणींचा विचार करू लागला आहे. यावर राहुरीचे व्यवस्थापन ऊस मिळविण्यात यशस्वी होणार का? शिवाय कारखाना सुरू होणार असे पदाधिकारी म्हणत असताना दोन महिन्यावर हंगाम येऊन ठेपला असताना अजून एक डागडूजीही कामे सुरू नाहीत. अशी माहिती कामगार वर्गातून मिळते. मग नेमके हा कारखाना सुरू केल्याचे दाखवून सर्व गाळप राहुरीमार्फत प्रवरा, गणेशमध्ये होणार का? असाही प्रश्‍न पडला आहे.
या सर्व बाबींवर मात करून कारखान्याचे गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वच कारखानदारांना मोठी कसरत करावी लागणार असतानाच बंद पडलेल्या परंतु पुन्हा सुरू होऊ पाहणार्‍या राहुरीच्या तनपुरे कारखान्याचे धुराडे पेटून गाळप यशस्वी होईल व कारखाना हळूहळू का होईना कर्जातून मुक्त होऊन पुन्हा वैभवाचे दिवस येतील, हा प्रवास मात्र, स्वप्नवतच वाटतो.
  • डॉ. विखे यांना राहुरी सुरू केल्यास प्रवरेला नेण्यात येणारा ऊस बंद करून तो राहुरीलाच गाळप करावा लागेल. त्यातूनच उसाची निर्माण होणार्‍या टंचाईतून भावासाठी स्पर्धा झाल्यास या स्पर्धेत किती कारखाने तग धरणार व त्यात राहुरीचा टिकाव लागेल का? हा प्रश्‍नही आहेच. 
  • उसावर पांढरी माशी, पाकोळी, लोकरी मावा, याही रोगांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केलेले दिसत असून यातूनही मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येणार आहे. संगमनेर, अगस्तीच्या कार्यक्षेत्रात तर याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती मिळते. कारखान्यामार्फत फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु उत्पादनात घट येणारच हे मात्र, नक्की!

LEAVE A REPLY

*