ऊस दरवाढीची बैठक पुन्हा निष्फळ

0

पहिली उचल 2300 रुपये देण्यावर कारखानदार ठाम संघर्ष समितीला तोडगा अमान्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या उसाची पहिली उचल यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. मात्र, कारखान्यांकडून पहिल्या उचलीपोटी दोन हजार 300 रुपये प्रमाणे दर देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही संघर्ष समितीला हा तोडगा मान्य झाला नाही. संघर्ष समितीने आज गुरुवारपासून लोणी (ता. राहाता) या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे यावेळी जाहीर केले. 

दरम्यान, लोणी येथे पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करता येणार नाही. या ठिकाणी आंदोलन करण्यास लोणी ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, यामुळे या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती बैठक संपल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजीत माने आणि पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांना दिली. त्यावर ‘इन्क्लाब’चा नारा देत आम्हाला जेलमध्ये टाका आंदोलन होणार असल्याची घोषणा देत संघर्ष समितीचे सदस्यांनी बैठक स्थळ सोडले.
राज्यातील 11 जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र एकत्र येत उसाची पहिली उचल 3 हजार 500 रुपये मिळावी, यासह उपपदार्थांच्या नफ्यात 50 टक्के वाटा मिळावा, यासाठी मागणीसाठी आंदोलनाची

हाक दिली होती. हे आंदोलन सहकाराचे जनक पद्मश्री विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोर करण्याचा इशारा देण्यात आला. हे आंदोलन टाळता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन, प्रादेशिक सहसंचालक (साखर) आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात साधारण साडेचार तासांत दोन टप्प्यात ही बैठक झाली. पहिल्या टप्प्यात संघर्ष समितीच्यावतीने ऊस उत्पादकांची बाजू मांडली, तसेच कारखानदार शेतकर्‍यांशी पिळवणूक करतात, हे सांगण्याचा प्रयत्न केला. राज्यात सर्व जिल्ह्यात उसाचा उत्पादन खर्च सारखा असतांना वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या उसाला वेगवेगळा भाव कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच कारखान्यांच्या वजन काट्यात घोटाळा असूनची उसाची वजनांची माहिती ऑनलाईन साखर आयुक्त कार्यालयास जोडण्याची मागणी करण्यात आली.

पहिली उचल 3 हजार 500 रुपये मिळावी, या मागणीवर संघर्ष समिती ठाम आहे. कृषी विद्यापीठाने उसाचा प्रती टन उत्पादन खर्च 2 हजार 710 रुपये येत असून याप्रमाणे शेतकर्‍यांना भाव मिळावा, यासह उपपदार्थांच्या नफ्यात 50 टक्के वाटा मिळावा, अशी मागणी केली. मात्र, मुुंबई झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कारखानदार यांनी एफआरपी आणि 200 रुपये देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, नगरच्या बैठकीत कारखान्यांनी एक पाऊल पुढे टाकत 2 हजार 300 रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे शेतकरी संघटना देखील हा दर मान्य करत पुढील दोन महिन्यांत उर्वरित 250 रुपये प्रमाणे शेतकर्‍यांना पैसे द्यावी, अशी मागणी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली. अखेर कारखान्यांदारांनी ते देण्यास असमर्थता दर्शविली.

केंद्र आणि राज्य सरकारने कारखान्यांना आर्थिक मदत देत, साखरेचे भाव 3 हजार 500 रुपयांच्या कमी होऊन न दिल्यास शेतकर्‍यांना 2 हजार 500 काय त्यापेक्षा अधिक भाव देऊ असे कारखानदारांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कारखानानिहाय उसाचा पहिली उचल यावेळी घोषित करण्यात आली. सध्या बाजारातील साखेरचे मुल्य आणि दिवसंदिवस साखरेच्या भाव होणारी घसरण यामुळे 2 हजार 300 रुपयांचा भाव देतांना कारखान्यांच्या नाकीनऊ येणार असल्याचे यावेळी कारखानदार यांच्याकडून सांगण्यात आले. 2 हजार 300 पेक्षा अधिक उचल जाहीर होत नसल्याचे पाहून संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानत आंदोलन करण्याची घोषणा करत बैठकीचा समारोप केला.
यावेळी समितीच्या सदस्यांना थांबवण्याची विनंती जिल्हाधिकारी माने यांनी केली. त्यावर नवले, बाळासाहेब पटारे, कॉ. बन्सी सातपुते यांनी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत नियोजन भवनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर लोणी या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा समितीने आंदोलनाचे ठिकाण बदलावे, लोणीत आंदोलनास ग्रामस्थांचा विरोध आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, यामुळे लोणीत आंदोलनास परवानगी देत येणार नाही, असे पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितल्यानंतर आंदोलक निर्णयावर ठाम असल्याचे सांगत नियोजन भवनाबाहेर बाहेर पडले. बैठकीला जिल्हाधिकारी माने, पालीस अधीक्षक शर्मा, उपप्रदेशिक सहसंचालक संगिता डोंगरे, विशेष लेखा परिक्षक बी.के. बेंद्र, प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांच्या अधिकारी उपस्थित होते.

गंगामाई कारखान्याला नोटीस देण्याचे आदेश  – 
बैठकीला साईकृपा, पियुष आणि अंबालिक कारखान्याचे प्रतिनिधी गैरहजर होते. यामुळे या कारखान्यांचे पहिली उचलची माहिती मिळाली नाही. ज्या गंगामाई कारख्यान्यांच्या दरावरून गोळीबार झाला त्या कारखान्यांचे जबाबदार अधिकार्‍यांनी बैठकीला दांडी मारली. तसेच शेवगावला झालेल्या बैठकीत गंगामाईकडून 2 हजार 252 रुपयांचा भाव देण्याचे लेखी दिल्यानंतरही बुधवारच्या बैठकीत अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला नसल्याचे उत्तर दिल्याने गंगामाई कारखान्याला नोटीस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी माने यांनी सहसंचालक, साखर यांनी दिले.

सर्वाधिक उचल ज्ञानेश्‍वर, केदारेश्‍वरची..
साईकृपा देवदैठण दोन हजार 551, केदारेश्‍वर दोन हजार 550, ज्ञानेश्‍वर दोन हजार 500, संगमनेर दोन हजार 300, अशोक दोन हजार 100, मुळा दोन हजार 300, वृध्देश्‍वर दोन हजार 150, प्रवरा दोन हजार 300, लोणी दोन हजार 300, अगस्ती दोन हजार 300, काळे दोन हजार 300, संजीवनी दोन हजार 300, नागवडे दोन हजार 300, कुकडी दोन हजार 300, श्रीराम 2300, प्रसाद दोन हजार 300. 

शरद पवारांसह कारखानदार आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यासह अन्य कारखानदार आज गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते साखरेच्या सतत कोसळणार्‍या दरावर चिंता व्यक्त करीत राज्य सरकारने साखर कारखानदारी टिकवण्यासाठी या प्रकरणी हस्तक्षेप करत साखरेचे दर तीन हजार 500 पेक्षा अधिक कसे राहतील याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती नागवडे कारखान्यांचे एमडी केशवराव मगर यांनी दिली. तसेच यावेळी मळी आणि बगॅस तारण ठेवून त्यावर सरकार अथवा बँकांनी कारखान्यांना पैसा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

*